सत्तर वर्षं शेतात मजुरी केल्यानंतर, वयाच्या ८३ व्या वर्षी गंगप्पांनी स्वतःला महात्मा गांधींचं रुप दिलंय. ऑगस्ट २०१६ पासून ते गांधींचं सोंग घेऊन पश्चिम आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर शहरात वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. शेतात मजुरी मिळायची त्यापेक्षा यातून मिळणारी भीक जास्तच आहे.
“मी तुमच्या वयाचा झालो, की तुमच्यासारखेच कपडे घालीन, स्वामीजी,” अनंतपूरला गांधीजी आले तेव्हा लहानग्या गंगप्पांनी त्यांना असं सांगितल्याचं त्यांना स्मरतं. “माझे आई-वडील तेव्हा पेरूरू तलावावर मजुरी करत होते, त्यांच्यासोबत होतो मी.” गंगप्पांचा जन्म झाला ते चेन्नमपल्ली पेरूरूहून फार दूर नाही. ध्येय गाठण्याची त्यांची क्षमता, मोठ्या मोठ्यांना कह्यात आणण्याची त्यांची ताकद त्या वेळी गंगप्पांना भावली होती.
गंगप्पा खरंच गांधीजींना भेटले होते का किंवा कधी भेटले हे पडताळून पाहणं अवघड असलं तरी गांधीजींच्या त्या स्मृतीने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. गंगप्पांना प्रवास करायला आवडतं – गांधी बनायचं असेल देशाटन आणि चिकाटी आवश्यकच, त्यांचा विश्वास आहे.
गंगप्पा (ते आडनाव लावत नाहीत) म्हणतात आता त्यांचं नाव गंगुलप्पा झालंय कारण लोक चुकीने त्यांना तसंच बोलावतात. गांधीजींचं सोंग हुबेहूब वठावं यासाठी ते जानवं घालतात. कपाळावर आणि पावलांवर टिळा लावतात आणि कधी कधी ‘भटा’सारखा गांधींच्या वेशात असताना लोकांना हात उंचावून आशीर्वाद देतात.
त्यांनी ही नवी ओळख धारण केल्यामुळे गावातल्या देवळाची दारं त्यांना खुली झाली आहेत. दिवसा त्यांना देवळातल्या चौथऱ्यावर विश्रांती घ्यायची परवानगी मिळाली आहे. देवळातल्याच नळावर ते स्नान करतात आणि अंगाचा रंग उतरवतात.






