सुरेश मेहेंदळेंना एकच घोर लागून राहिलाय. आपला बस स्टँड नीट असेल ना, साफसफाई केली असेल ना. आणि रोज ज्या पिलांना बिस्किटं भरवायचो ती ठीक असतील ना याचाच विचार त्यांच्या मनात आहे. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या पौडचा बस स्टँड आणि तिथला चौकशी कक्ष बंद आहे. पौडहून येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसची वाहतूक मेहेंदळे नियंत्रित करतात.
“गेले चार आठवडे मी पौडला गेलो नाहीये. सगळं ठीक असू दे म्हणजे झालं,” ५४ वर्षीय मेहेंदळे मला सांगतात. पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २६ नोव्हेंबर रोजी मी त्यांची भेट घेतली. डेपोच्या प्रवेशदारावर एका मांडवात मेहेंदळे आणि त्यांचे सहकारी निदर्शनं करतायत. २७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी संपावर आहेत.
पुण्याच्या स्वारगेट डेपोचे सुमारे २५० वाहक आणि २०० चालक संप करतायत. “गेल्या वर्षात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एक दिवसाचं निदर्शन केलं. गेल्या वर्षात किमान ३१ कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय,” मेहेंदळे सांगतात. एकूण ३३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत आणि कोविड-१९ च्या महासाथीत परिस्थिती अधिकच वाईट झाली. मालवाहतुकीतून येणारं उत्पन्न वगळता महामंडळाकडे इतर कुठलंच उत्पन्न नव्हतं.








