पूर्व घाटातील खडतर डोंगररांगांआड सूर्य अस्ताला जात असताना शेजारच्या रानातील पहाडी मैनेची कर्कश शीळ निमलष्करी जवानांच्या बुटांच्या भारदस्त आवाजाखाली चिरडली जाते. ते आज पुन्हा इथल्या गावांमध्ये गस्त घालताहेत. तिला सर्वात जास्त भीती वाटते ती रात्री.

आपलं नाव देमती का ठेवण्यात आलं ते तिला ठाऊक नाही. "ती आपल्या गावातली एक धीट बाई होती, जिनं एकटीनं इंग्रज सैनिकांना पळवून लावलं," आई उत्साहानं तिची कहाणी सांगायची. ती मात्र देमतीसारखी अजिबात नव्हती – ती भित्री होती.

आणि ती जगायला शिकली होती, पोटदुखी, उपासमार सहन करत, साशंक आणि घातक नजरेखाली रोजची जेरबंदी, अत्याचार, लोकांचं मरण वगैरे पाहत, पैशा-पाण्याविना घरात राहून दिवस काढायला. पण या सगळ्यात तिच्या बाजूने होतं ते हे जंगल, त्यातील वृक्ष आणि एक झरा. तिला साल वृक्षाच्या फुलांमध्ये आपल्या आईचा गंध यायचा, रानात आजीच्या गाण्यांचे पडसाद ऐकू यायचे. त्यांची साथ आहे तोवर आपण सगळ्या संकटांचा मुकाबला करू, हे तिला माहीत होतं.

पण आता जोवर तिला माहित असलेल्या गोष्टींचा पुरावा म्हणून ती एखादा कागद दाखवणार नाही, तोवर त्यांना ती येथून बाहेर हवी होती – तिच्या झोपडीतून, तिच्या गावातून, तिच्या मातीतून. तिच्या वडिलांनी तिला औषधी गुण असणाऱ्या विविध झाडाझुडपांची, खोडांची आणि पानांची नावं सांगितली होती, एवढं पुरेसं नव्हतं. ती आपल्या आईबरोबर फळं, मेवा आणि सरपण गोळा करायला जायची तेव्हा दरवेळी आई ज्या झाडाखाली तिचा जन्म झाला, ते तिला दाखवायची. तिच्या आजीने तिला रानाबद्दलची गाणी शिकवली होती. या जागेभोवती पक्षी पाहत, त्यांच्या हाकेला ओ देत ती आपल्या भावासह बागडली होती.

पण असलं ज्ञान, या कहाण्या, ही गाणी आणि लहानपणीचे खेळ कुठल्या गोष्टीचा पुरावा ठरू शकतील का? ती आपल्या नावाचा अर्थ शोधत आणि जिच्या नावावरून ते ठेवण्यात आलं, त्या महिलेचा विचार करत बसून राहिली. ती या जंगलाचा भाग आहे, हे देमतीने कसं काय सिद्ध केलं असतं?

सुधन्वा देशपांडे यांच्या आवाजात ही कविता ऐका

देमती देई शबर नुआपाडा जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावाच्या नावावरून ' सलिहान' म्हणून ओळखल्या जातात. २००२ मध्ये पी. साईनाथ त्यांना भेटले तेव्हा त्यांनी नव्वदी गाठली होती ( त्या कहाणीचा दुवा खाली आहे). त्यांचं अदम्य साहस अपुरस्कृत असून त्यांच्या गावापलिकडे जवळपास विस्मृतीत गेलंय, आणि त्या दैन्याचं जिणं जगत होत्या

विश्वरूप दर्शन*

आपल्या लहानशा झोपडीत
मातीने लिंपलेल्या उंबरठ्यावर बसून
ती खळाळून हसतेय
त्या चित्रात.
तिच्या हास्याने
अघळपघळ नेसलेल्या
तिच्या साडीचा कुंकुम वर्ण
झालाय आणखीच गहिरा.
तिच्या हास्याने
तिच्या हासळीला अन् उघड्या खांद्यांवरील
सुरकुतलेल्या त्वचेला
आलीये रुपेरी झळाळी.
तिच्या हास्याने
गिरवलंय तिच्या हातावरील
हिरवं गोंदण.
तिच्या हास्याने
उधळल्या तिच्या करड्या केसांच्या
विस्कटलेल्या बटा
सागरी लाटांप्रमाणे.
तिच्या हास्याने
उजळले तिचे नेत्र
मोतीबिंदूच्या आड
पुरलेल्या स्मृतींनी.

बराच वेळ
मी तिच्याकडे पाहत राहिले
वृद्ध देमती खळखळून हसतेय
तिचे खिळखिळे दात दाखवत.
तोच पुढील दोन मोठ्या दातांच्या फटीतून
तिने मला खेचून नेलं
खोलवर
तिच्या उपाशी पोटी.

नजर जाईल तिथपर्यंत
आणि त्याहून पलिकडे
होता बोचरा काळोख.
ना दिव्य मुद्रा
ना मुकुट
ना गदा
ना चक्र
केवळ लक्षावधी सूर्यांच्या तेजाने
तळपणारी एक नेत्रदीपक काठी धरून
उभी ठाकलीये देमतीची नाजूकशी प्रतिमा
तिच्यातून उगम पावून
तिच्यातच लोपत आहेत
एकादश रुद्र
द्वादश आदित्य
अष्टवसू
अश्विनीकुमार
एकोणपन्नास मारुत
गंधर्वगण
यक्षगण
असुर
आणि सिद्ध ऋषि.
तिच्यातून जन्मल्या
चाळीस सलिहा कन्या
आणि चौऱ्यांशी लक्ष चारण कन्या**
सर्व उठावकर्ते
सर्व क्रांतिकारी
सर्व स्वप्न पाहणारे
क्रोध आणि एल्गाराचे अनंत ध्वनी
अरवली आणि
गिरनारसारखे
कणखर पर्वत.
तिच्यातूनच जन्मलेत
माझे आईवडील,
माझं संपूर्ण ब्रह्मांड!

लेखिकेने तिच्या मूळ गुजराती कवितेच्या केलेल्या इंग्रजी अनुवादावरून.

खऱ्या देमतीची कहाणी तुम्ही इथे वाचू शकता.

ध्वनी: सुधन्वा देशपांडे हे जन नाट्य मंचाशी निगडित अभिनेता दिग्दर्शक आहेत आणि लेफ्टवर्ड बुक्स मध्ये संपादक आहेत.

शीर्षक चित्रः मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

* विश्वरूप दर्शन म्हणजे गीतेच्या ११ व्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला दाखवलेलं स्वतःचं खरं, सनातन रूप होय. लक्षावधी नेत्र, मुख, अस्त्रधारी भुजा असलेल्या या रूपाने सकल चराचर आणि देवीदेवतांच्या रूपांसह अनंत ब्रह्मांड व्यापलं आहे, असं या अध्यायात वर्णन केलंय .

** चारण कन्या हे झवेरचंद मेघानी यांच्या एका सुप्रसिद्ध गुजराती कवितेचं शीर्षक आहे. यात आपल्या पाड्यावर आक्रमण करणाऱ्या सिंहाला काठीने पळवून लावणाऱ्या चारण जमातीच्या एका १४ वर्षीय मुलीच्या धिटाईचं वर्णन केलंय.

अनुवाद: कौशल काळू

Pratishtha Pandya

प्रतिष्ठा पांड्या पारीमध्ये वरिष्ठ संपादक असून त्या पारीवरील सर्जक लेखन विभागाचं काम पाहतात. त्या पारीभाषासोबत गुजराती भाषेत अनुवाद आणि संपादनाचं कामही करतात. त्या गुजराती आणि इंग्रजी कवयीत्री असून त्यांचं बरंच साहित्य प्रकाशित झालं आहे.

यांचे इतर लिखाण Pratishtha Pandya
Translator : Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.

यांचे इतर लिखाण कौशल काळू