वजन पाच किलोनं कमी झालं आणि बजरंग गायकवाड समजून चुकला की होत्याचं नव्हतं झालं. “या आधी मी दर दिवसाला सहा लिटर म्हशीचं दूध, ५० बदाम, १२ केळी आणि दोन अंडी खायचो. एका आड एक दिवस वशाट असायचं,” तो सांगतो. आणि आता मात्र हा सगळा खुराक आठवड्याभरात किंवा कधी कधी त्याहून जास्त दिवसांत मिळून घ्यावा लागतोय. त्याचं वजन कमी होऊन ६१ किलोवर आलंय.
“पैलवानाचं वजन कमी नाही व्हायला पाहिजे,” कोल्हापूरच्या जुने पारगावचा पैलवान, २५ वर्षीय बजरंग सांगतो. “अंगातली ताकद कमी होते, कुस्तीत हवी ती चाल टाकता येत नाही. आमच्या तालमीइतकाच आमचा खुराक पण फार महत्त्वाचा आहे.” पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या इतर पैलवानांप्रमाणे मैदान - लाल मातीतल्या कुस्त्या - मारून मिळवलेल्या पैशातून बजरंग आपला खुराक भागवत होता.
कोल्हापूरच्या दोनोली गावात बजरंगने मैदान मारलं त्याला आता ५०० दिवस उलटून गेलेत. “वाईटात वाईट दुखापत जरी झाली असती तरी मी इतका खंड पडू दिला नसता,” तो म्हणतो.













