पहिला पाऊस सानिया मुलाणीच्या मनात आपल्या जन्माशी निगडीत आक्रिताच्या आठवणी घेऊन येतो.
२००५ साली जुलै महिन्यातला तिचा जन्म. जन्माच्या आठवडाभर आधी आलेल्या महापुरात १,००० जणांचा जीव गेला आणि महाराष्ट्रातल्या दोन कोटी लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. “पुरात जन्मली, आता आयुष्यभर हा पूर पाठ सोडणार नाही,” किती तरी जण तिच्या आई-वडलांना हेच सांगत होते.
जुलै २०२२. जोराचा पाऊस सुरू झाला आणि १७ वर्षीय सानियाच्या मनात या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. “कुणी जरी म्हटलं ना, पाणी वाढत चाललंय म्हणून, मला पूर येणार अशीच भीती वाटायला लागते,” कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या भेंडवड्यात राहणारी सानिया म्हणते. २०१९ पासून या ४,६८६ लोकवस्ती असणाऱ्या गावाने दोन महापुरांचा मुकाबला केला आहे.
“२०१९ साली ऑगस्ट महिन्यात पूर आला, तेव्हा फक्त २४ तासात आमच्या घरात सात फूट पाणी भरलं होतं,” सानिया तेव्हाच्या आठवणी सांगते. पाणी भरायला लागलं आणि लगेचच मुलाणी कुटुंबीय घर सोडून सुरक्षित स्थळी गेले. पण सानियाच्या मनावर त्याचा फार खोल आघात झाला आहे.
२०२१ साली जुलै महिन्यात पुन्हा एकदा या गावाला पुराचा फटका बसला. गावाबाहेर उभारलेल्या निवाऱ्यात तीन आठवडे काढल्यानंतर हे कुटुंब गावी परतलं, तेही सुरक्षित असल्याचं गावातल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरच.
२०१९ साली आलेल्या पुरानंतर तायक्वोंदो खेळाडू असलेली सानिया ब्लॅक बेल्ट मिळवण्यासाठी मेहनत घेत होती, त्याला पुरती खीळ बसली आहे. गेली तीन वर्षं तिला सतत थकवा जाणवतोय. अस्वस्थता, चिडचिड आणि चिंतेचं प्रमाण वाढलंय. “मला माझ्या ट्रेनिंगवर लक्षच केंद्रित करता येत नाही,” ती म्हणते. “आता सगळं पावसावर अवलंबून आहे.”





















