२०२१ साली जुलै महिन्यात पुराचं पाणी घरात शिरू लागलं आणि शुभांगीताई कांबळेंना घर सोडावं लागलं. पण बाहेर पडता पडता न चुकता तिने दोन वह्या मात्र सोबत घेतल्या.
आणि याच दोन वह्यांमुळे पुढच्या काही महिन्यांत ती अनेकांचा जीव वाचवू शकली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिच्या अर्जुनवाड गावात आणखी एक आपत्ती आलेली होती. कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. आणि शुभांगीताईच्या वह्यांमध्ये गावातल्या कोविड रुग्णांची संपर्कासहित सगळी माहिती, घरच्या लोकांचे फोन क्रमांक, आधीची आजारपणं, बाकी माहिती असे सगळे तपशील नीट लिहिलेले होते.
“कोविडचे रिपोर्ट [गावात केलेल्या आरटी-पीसीआर तपासण्यांचे रिपोर्ट] सगळ्यात आधी माझ्याकडे यायचे,” ३३ वर्षीय शुभांगीताई सांगते. २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत दहा लाखांहून अधिक आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली होती. शुभांगीताई यातलीच एक. आपल्या वहीतल्या तपशिलांची मदत घेत शुभांगीताईने गावातल्या एका कोविड रुग्णाचा तपास घेतला. त्याला शिरोळ तालुक्यातल्या एका निवारा केंद्रात हलवण्यात आलं होतं. तिथे ५,००० लोक कोविड रुग्णाच्या आणि विषाणूच्या संपर्कात आले होते.
“पुरामुळे अनेकांचे फोन बंद होते किंवा नेटवर्क मिळत नव्हतं,” शुभांगीताई सांगते. ती स्वतः १५ किलोमीटरवरच्या तेरवाडला आपल्या माहेरी गेली होती. तिने लागलीच आपल्या वहीतल्या हाताने लिहिलेल्या नोंदी तपासल्या. त्यात तिला काही इतरांचे संपर्क क्रमांक मिळाले. “काही तरी करून मला त्या रुग्णाशी संपर्क साधता आला.”






















