पूर्ण पीपीई वेशात जणू काही परग्रहावरून आल्यासारखे ते साउथ २४ परगणामधल्या त्याच्या गावी आले. “जनावर पकडावं तसं ते मला धरायला आले,” हरणचंद्र दास सांगतो. त्याचे मित्र त्याला हरू म्हणतात – पण ते काही आता त्याला आपले मित्र वाटत नाहीत. इतक्यात त्यांनी त्याला वाळीत टाकायला सुरुवात केलीये. “लोक माझ्या कुटुंबाला किराणा माल आणि दूध देत नाहीत. आमचा किती तरी प्रकारे छळ मांडलाय रात्र रात्र आमचा डोळ्याला डोळा लागत नाही. आमचे सगळे शेजारी आम्हाला घाबरायला लागलेत.” हरणचंद्र यांना कोविडची लागण झाली नसल्याचा अहवाल असला तरीही.
त्याचा गुन्हाः तो एका रुग्णालयात काम करतो. आणि बहुतेक आरोग्य कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. कुणास ठाऊक त्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याला संसर्ग झाल्याची शंका असावी.
“सगळ्यांना हीच भीती होती, का तर मी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि त्यामुळे मला लागण झालीच असणार,” तो म्हणतो.
तिशी पार केलेला हरणचंद्र कोलकात्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ (आयसीएच) मध्ये काम करतो. एका सेवाभावी संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या या रुग्णालयात शहरातल्या तसंच ग्रामीण आणि उपनगरातल्या बालकांवर उपचार केले जातात. १९५६ साली सुरु करण्यात आलेलं हे भारतातलं पहिलं बाल रुग्णालय आहे. पार्क सर्कस भागात असलेल्या २२० खाटांच्या आपल्या बालकांना पालक घेऊन येतात कारण असे उपचार इतर कुठेही, इतक्या परवडणाऱ्या दरात त्यांना मिळत नाहीत.
कोविड-१९ आणि टाळेबंदीमुळे मात्र त्यांना आयसीएचला पोचणंही मुश्किल होऊन गेलं आहे. “इथे पोचणंच अवघड झालंय,” साउथ २४ परगण्यातून इथे नुकताच पोचलेला रतन बिस्वास सांगतो. “मी एका पानमळ्यात रोजंदारीने काम करत होतो. [मे २०२० मध्ये आलेल्या] अम्फान वादळामुळे पानमळा उद्ध्वस्त झाला आणि माझी कमाई बंद पडली. माझ्या धाकट्या मुलाच्या कानामागे काही तरी संसर्ग झालाय म्हणून आम्ही त्याला इथे घेऊन आलोय. रेल्वे बंद आहेत, त्यामुळे इथे पोचणं मुश्किल झालंय.” बिस्वास सारखे लोक मग, रिक्षा, बस आणि बरंचसं अंतर पायी चालत रुग्णालयात येतात.
आयसीएचमधल्या डॉक्टरांना इतरही अनेक समस्यांची चाहुल लागलीये.




















