दादरच्या वाहत्या रस्त्यावरती रोज सकाळी शिवम सिंग एक लाल सतरंजी अंथरतो. या चार बाय पाच फुटाच्या सतरंजीवर तो चार पाच प्लास्टिकचे मोडे नीट ठेवतो. नंतर एका मोड्याच्या खाली तो लक्ष्मीचा फ्रेम केलेला फोटो ठेवतो आणि एक समोर उदबत्ती पेटवतो.
ज्या पिंपळाखाली त्याने त्याचं दुकान थाटलंय त्यावर एक फलक टांगलाय ज्याच्यावर लिहिलंय – ‘शिवम मेहेंदी आर्टिस्ट’. या फलकावर आणि त्याच्या मोड्यांवरच्या फोटो अल्बममध्ये मेंदीने सजलेल्या हातांचे आणि पावलांचे फोटो आहेत. आता शिवम पहिल्या गिऱ्हाइकाची वाट पाहतोय. तिने येऊन फक्त नक्षी निवडायची – फुलं, कुयऱ्या, साखळ्या किंवा मग गिऱ्हाइकाच्या हाताकडे पाहून शिवमलाच काही नक्षी सुचते. “कुणी तरी येईल...” तो म्हणतो, आजचा दिवस चांगला जाणार अशी त्याला आशा आहे.
त्याच्यापासून २०० मीटरवर दादर स्टेशनपासून जवळच रानडे रोडवर शिवा नायकनेदेखील त्याचं दुकान थाटलंय. ओली मेंदी भरून प्लास्टिकचे कोन तयार करणं हे दिवसाचं पहिलं काम. ज्या फूटपाथवर दुकान थाटलंय तिथे काही ना काही गजबज सुरू असते. इथे अनेक वस्तू विकल्या जातात त्याही स्थलांतरितांकडून – फुलं विकणारा सोलापूरचा, दागिन्यांची दुरुस्ती करणारा लखनौहून आलाय, बूट विक्रेता कोलकात्याचा तर आइस्क्रीमची गाडी राजस्थानच्या विक्रेत्याची.





