“मला आठवतंय वरच्या छपरातून उंदीर खाली घरात पडायचे आणि मरायचे. आजवर तितकं अभद्र मी काही पाहिलेलं नाही. आज तुम्हाला हसू येईल पण छपरातनं उंदरं पडणं म्हणजे घर सोडायचं इतकंच आम्हाला कळत होतं. परत कधी येणार, माहित नाही.”
तेव्हाच्या स्मृती इतक्या जिवंतपणे सांगणाऱ्या या आहेत ए. कुळंधइअम्माल. कोइम्बतोरच्या कळपट्टीच्या रहिवासी. आज ऐंशी वर्षं पार केलेल्या अम्मल तेव्हा नुकत्याच किशोरवयात आल्या होत्या. तेव्हा म्हणजे १९४० च्या दशकाची पहाट होत होती तेव्हा. तमिळ नाडूच्या या शहराला तेव्हा बसलेला प्लेगचा विळखा शेवटचा.
कोइम्बतोर शहराला साथींनी - अगदी देवीपासून ते प्लेग आणि कॉलरापर्यंत- ग्रासल्याच्या या नकोशा काही आठवणी आहेत. अशा साथींनंतर या भागात एक विशिष्ट अशी प्रथा सुरू झाली. राज्याच्या इतरही भागात हे घडलं, पण कोइम्बतोरमध्ये खचित अधिकच. ‘प्लेग मारिअम्मन’ म्हणून ओळखली जाणारी मंदिरं (ही ‘ब्लॅक मारिअम्मन’ म्हणूनही ओळखली जातात). या शहरात अशी किमान सोळा मंदिरं आहेत.
आणि अर्थातच कोविड-१९ ची साथ आल्यावर एक ‘करोना देवी’ मंदिरही उभं राहिलंय. पण आजही प्लेग मारिअम्मनकडेच लोकांचा ओढा जास्त आहे. शेजारच्या तिरुप्पुर जिल्ह्यात देखील अशी काही देवळं आहेत आणि तिथेही काही उत्सव होतात, भाविक येतात.
१९०३ ते १९४२ या काळात कोइम्बतोरमध्ये किमान १० वेळा प्लेगची साथ आल्याच्या नोंदी आहेत. या साथींनी हजारो लोकांचा बळी घेतला. प्लेगने इथून काढता पाय घेतला असला तरी आज इतक्या वर्षांनंतरही लोकांच्या स्मृतीतून मात्र तो गेलेला नाही. कुळंधइअम्माल यांच्यासारख्या ज्येष्ठांना आजही प्लेगचा उल्लेख केला असता गतकाळात या शहराने काय भोगलं त्या कडुजार आठवणींनी अंगावर शहारा येतो.
टाउन हॉल परिसरातलं प्लेग मारिअम्मन मंदीर यातलं सगळ्यात प्रसिद्ध आहे. या देवळाबाहेर फुलं विकणारी कन्नम्मल संध्याकाळच्या तयारीत मग्न आहे. “आज शुक्रवार आहे. भरपूर भाविक येणार,” चाळिशीची कन्नम्मल सांगते. तिचं लक्ष हातांवर, कारण हार तयार करणारे हात बोलतनाही थांबलेले नाहीत.
“तिची शक्ती तुम्हाला माहित नाहीये. आता करोना देवीचं देऊळ बांधा नाही तर काहीही करा, ब्लॅक मारिअम्मन आमची स्वतःची आहे. आम्ही तिचीच पूजा करणार. आजारी पडल्यावर तर करणारच. पण एरवीसुद्धा.” 'एरवी' म्हणजे भाविक नेहमी ज्या कारणांसाठी देवीचा धावा करतात तेव्हा – सुखसमृद्धी येऊ दे, यश मिळू दे आणि दीर्घायुष्य लाभू दे. कन्नम्मलचा जन्म झाला तेव्हा प्लेगचा काळ जाऊन चाळीस वर्षं उलटली होती. पण तिच्या पिढीचे अनेक जण आजही मारिअम्मनची कृपा रहावी म्हणून या देवळांमध्ये गर्दी करतात.












