“गीताला खूप त्रास होत होता, अंगात कणकण होती आणि चक्कर येत होती. दुसऱ्या दिवशी तिला मोठ्या उलट्या व्हायला लागल्या,” सतेंदर सिंग सांगतात.
दुसऱ्या दिवशी, १७ मे रोजी, रविवारी, काय करावं तेच सतेंदरना समजत नव्हतं. त्यांनी एका धर्मादाय संस्थेच्या अँम्ब्युलन्सला फोन केला आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलला पोचण्यासाठी मदत करायला सांगितलं. तिथे पोचल्या पोचल्या गीतांना तातडीच्या सेवा विभागात दाखल करून घेतलं आणि त्यांची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. सोमवारी त्यांना विषाणूची लागण झाल्याचं सिद्ध झालं.
गीता यांना जठराचा कॅन्सर आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी त्या आणि सतेंदर पुन्हा मुंबईच्या परळ भागातल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलजवळच्या पदपथावर राहू लागले. त्या आधी काही आठवडे ते दोघं, इथून ५० किलोमीटर दूर डोंबिवलीला एका नातेवाइकांच्या घरी राहत होते. ही सोयसुद्धा खूप विनवण्या केल्यानंतर झाली होती. खाण्याचे आणि भाड्याचे पैसे देण्याच्या बोलीवर.
नोव्हेंबर महिन्यात ४० वर्षीय गीता आणि ४२ वर्षीय सतेंदर कोल्हापूरच्या इचलकरंजीहून मुंबईत दाखल झाले. त्यांचा मुलगा, १६ वर्षांचा बादल आणि १२ वर्षांची खुशी इचलकरंजीत सतेंदर यांच्या मोठ्या भावापाशी राहतायत. दहा एक वर्षांपूर्वी हे कुटुंब बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या दिनारा तालुक्यातल्या कनियारी गावातून इथे स्थलांतरित झालं होतं. सतेंदर इचलकरंजीच्या एका यंत्रमाग कारखान्यात काम करत होते, महिन्याला ७,००० कमवत होते. गीतांना घेऊन मुंबईला येईपर्यंत त्यांचं काम चालू होतं.
“आम्ही आमच्या मुलांना शब्द दिलाय की आम्ही लवकर परत येऊ म्हणून, पण आता त्यांचं तोंड कधी पहायला मिळेल काही सांगता येत नाही,” गीता मला मार्च महिन्यातच म्हणाल्या होत्या.
नोव्हेंबर महिन्यात जेव्हा हे दोघं मुंबईला आले, तेव्हा ते गोरेगावला सतेंदर यांच्या चुलतभावाकडे राहिले. पण कोविड-१९ ची भीतीमुळे त्यांना त्या भावाने दुसरीकडे जाण्याची विनंती केली. “आम्ही स्टेशनमध्ये आणि या फूटपाथवर राहत होतो,” मी २० मार्च रोजी गीतांना भेटले तेव्हा त्या सांगत होत्या. त्यानंतर ते डोंबिवलीला रहायला गेले. (पहा कॅन्सरग्रस्त, टाळेबंदीत, मुंबईच्या फूटपाथवर )
मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी लागू होत असताना हॉस्पिटलसमोरच्या फूटपाथवर राहणारे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांविषयी पारीने वृत्त दिलं त्यानंतर त्यांना अनेक व्यक्तींनी आर्थिक मदत केली. एका धर्मादाय संस्थेने गीता आणि सतेंदर यांना रुग्णवाहिकेची सुविधा मिळवून दिली. गीताच्या केमोथेरपी आणि इतर तपासण्यांसाठी डोंबिवलीहून ये-जा करायला त्याची खूप मदत झाली.
पण शहरातल्या कोविड-१९ च्या केसेस वाढायल्या लागल्या आणि रुग्णवाहिका इतर कामासाठी आवश्यक ठरली. मग सतेंदर आणि गीता बसने प्रवास करू लागले. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी केवळ गीताच्या केमोथेरपीसाठी परळला किमान ७-८ वेळा प्रवास केला असेल. तपासण्या, सीटीस्कॅन आणि इतर तपासण्यांसाठी तर अनेक वेळा.
हा प्रवास कष्टदायी होता. सकाळी ६.३० ला निघायचं, परळला जाणारी एसटी पकडायची, त्यानंतर बेस्टच्या बसने ९.३० पर्यंत हॉस्पिटलला पोचायचं. पण टाळेबंदीत प्रवास करण्यासाठी स्थानिक पोलिस चौकीने दिलेला सक्तीचा प्रवास पास नसल्याच्या कारणावरून त्यांना किती तरी वेळा बस सोडून द्यावी लागायची आणि मग दुसऱ्या बसची वाट बघेपर्यंत तासभर जास्त जायचा. “आम्हाला भर रस्त्यात खाली उतरवायचे. माझ्याकडे हॉस्पिटलचं पत्र होतं पण वाहकाचं म्हणणं होतं की सरकारी अधिकाऱ्याने दिलेलाच पास पाहिजे. कुणालाच बसमध्ये रुग्ण असायचा,” सतेंदर सांगतात.
संध्याकाळीही अशीच सगळी अडथळ्याची शर्यत पार करावी लागायची – संध्याकाळी ५ वाजता परळहून निघाले की डोंबिवलीला पोचायला रात्रीचे ९ वाजायचे. कधी कधी तर परळच्या हॉस्पिटलपासून बस थांब्यापर्यंतचं एवढ्याशा अंतरासाठीदेखील टॅक्सीवाल्यांना विनवण्या करायला लागायच्या असं सतेंदर सांगतात. रोजच्या प्रवासावर किमान ५०० रुपये खर्च केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
गीताच्या उपचारांच्या खर्चाचा काही वाटा रुग्णालयाने उचलला आहे, बाकी सतेंदरच्या बचतीतून होत आहे. आतापर्यंत २०,००० रुपये खर्च केले असावेत असा त्यांचा अंदाज आहे.
एप्रिलच्या अखेरीस एका कुठल्या तरी औषधाचा गीताला खूपच त्रास झाला आणि तिला सारख्या उलट्या व्हायला लागल्या, अन्नाचा कण पोटात ठरत नव्हता. त्यानंतर पोटात अन्न जावं म्हणून डॉक्टरांना त्यांच्या नाकात नळी घालावी लागली. त्याचा फार काही फायदा झाला नाही. अजूनही त्यांना नीट अन्न पचत नाहीये. प्रवास करणंच अशक्य व्हायला लागल्यावर सतेंदर यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी कुठे निवारा मिळतोय का ते पाहण्याची विनंती केली. “कुठेच खोली मिळत नाहीये असं त्यांनी मला सांगितलं,” ते सांगतात.
इचलकरंजीत असलेल्या आपल्या भावाच्या मदतीने ५ मे रोजी त्यांनी आपल्याला निवाऱ्याची गरज असल्याचं एक पत्र सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळवलं. “मला वाटलं होतं की आता तरी कुणी तरी माझं ऐकेल आणि मदत करेल. पण काय बोलायचं तेच कळत नाही...” सतेंदर म्हणतात.
“ते पत्र घेऊन आम्ही काही निवारागृहांमध्ये गेलो, पण कोणत्याही नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नका असे बृहन्मुंबई मनपाचे कडक आदेश असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं,” या दोघांना सहाय्य करणारे रुग्णवाहिका चालक अभिनय लाड सांगतात. “आता त्यांचाही नाईलाज आहे ते आम्हाला समजतंय.”
त्यानंतर मात्र, इतर काहीच पर्याय नाही हे पाहून १० दिवसांपूर्वी सतेंदर आणि गीता परत एकदा टाटा मेमोरियल रुग्णालयासमोरच्या फूटपाथवर आले आहेत. ज्या धर्मादाय संस्थेने (जीवनज्योत कॅन्सर सहाय्य आणि सेवा संस्था) त्यांच्या जेवणाची सोय केली.
जेव्हा गीताला कोविड-१९ ची लागण झाल्याचं सिद्ध झालं तेव्हा त्यांना रुग्णालयाच्या क्वारंटाइन खोलीत ठेवण्यात आलं. “तिला चालताही येत नव्हतं. मी आता तिला सोडून कसा जाणार, सगळ्या नळ्या होत्या नाकात,” सतेंदर सांगतात.
त्यांना देखील टाटा रुग्णालयापासून तीन
किलोमीटरवर असलेल्या कस्तुरबा रुग्णालयातून तपासणी करून घ्यायला सांगितलं होतं. पण
त्यांनी आपल्या पत्नीपाशीच थांबण्याचा ठाम निर्णय घेतला. २१ मे रोजी त्यांची टाटा
रुग्णालयातच तपासणी झाली आणि त्यात त्यांनाही लागण झाल्याचं कळालं. आता क्वारंटाईन
वॉर्डमध्ये सतेंदर गीताच्या शेजारीच दाखल झालेत.
त्यांना खूप अशक्त वाटतंय. सगळी धावपळ आणि गेल्या अनेक रात्री डोळ्याला डोळा लागलेला नाही, त्याचा हा परिणाम असल्याचं ते सांगतात. “मी बरा होईन,” ते सांगतात. गीतांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया करता येणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलंय.
रुग्णालयात कर्करोगाच्या शल्यचिकित्सा विभागातील वरिष्ठ निवासी डॉक्टर असणारे डॉ. योगेश बनसोड गीतांवर उपचार करतायत. त्यांच्या मते, गीतांचं पूर्ण जठर काढून टाकावं लागणार आहे. फोनवर त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, “त्यांच्या रक्तात आवश्यक पातळीच्या निम्मंदेखील हिमोग्लेबिन नव्हतं. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणं त्यांच्या जीवावर बेतू शकतं. तसंच श्वासमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यताही कमी व्हायला हवी. आता कोविडमुळे जास्त काही त्रास होऊ नये एवढीच आम्ही आशा करतोय.”
सतेंदर यांनी बादलला कोविडच्या संसर्गाबद्दल सांगितलंय. “माझ्या मुलीला सांगितलं तर तिला काही कळणार नाही आणि ती रडत बसेल,” ते सांगतात. “ती लहान आहे आणि किती तरी महिन्यांपासून तिची आमची गाठ पडली नाहीये. आम्ही आता लवकरच येऊ असं मी तिला सांगितलंय. आता मी खोटं बोललो का, कुणास ठाऊक...”
तोपर्यंत बादलने घरचं सगळं नीट पाहण्याचं वचन वडलांना दिलंय.
अनुवादः मेधा काळे