“माझ्या पिशवीत मी केळी भरून घेतली होती, त्याच्यावर पोट भरतोय,” सुरेंद्र राम मला फोनवर सांगत होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूच्या वेळी त्यांनी काय केलं ते. त्या दिवशी, मुंबईतली बहुतेक दुकानं आणि उद्योग बंद होते, ज्यांना शक्य होतं ते सगळे घरात थांबले होते, तेव्हाच सुरेंद्र परळच्या टाटा स्मृती रुग्णलयाशेजारच्या फूटपाथवर बसून राहिले होते.
सुरेंद्र ३७ वर्षांचे आहेत आणि त्यांना तोंडाचा कॅन्सर झालाय.
हा कर्फ्यू लागेपर्यंत हा फूटपाथच त्यांचं ‘घर’ होतं – त्यांनाच काय दक्षिण-मध्य मुंबईतल्या या धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर राहणाऱ्या त्याच्यासारख्या अनेक रुग्णांसाठी ‘घरातच राहणं’ हे शक्यच नाहीये. सरकारी अनुदानावर चालणाऱ्या या रुग्णालयात भारतभरातले अनेक गरीब लोक स्वस्तात कॅन्सरवर उपचार मिळतात म्हणून येतात.
“माझ्या तपासण्या झाल्या आहेत,” सुरेंद्र सांगतात. “डॉक्टरांनी मला चार महिन्यांनी यायला सांगितलंय.” पण बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या आपल्या पोतिलिया गावी जाणंच त्यांना अशक्य झालंय कारण आधी रेल्वे कमी केल्या आणि २५ मार्चच्या संपूर्ण टाळेबंदीनंतर तर पूर्णच थांबवल्या गेल्या. “आता ते सांगतायत की २१ दिवस सगळं चक्क बंद होणार आहे. मला तर काही बातम्या कळत नाहीत. आजूबाजूच्या लोकांनाच विचारावं लागतं. तोपर्यंत मी या फूटपाथवर कसं रहायचं, सांगा?” सुरेंद्र विचारतात.
मी २० मार्च रोजी त्यांना भेटले तेव्हा फूटपाथवर अंथरलेल्या केशरी रंगाच्या प्लास्टिकच्या चवाळीवर बसून तोंडाच्या एका बाजूने ते केळी खात होते. डाव्या नाकपुडीत एक नळी घातलेली होती. “माझ्या घशातून घास खाली जात नाही, म्हणून ही नळी लागते,” ते म्हणाले. तिथेच चवाळीवर एका काळ्या पिशवीत त्यांनी त्यांचे कपडे, डॉक्टरांचे अहवाल, औषधं आणि केळी कोंबून ठेवली होती.
भर दुपारी देखील फूटपाथवर उंदरांचा सुळसुळाट होता. रुग्णांच्या जवळच काही घुशी मरून पडलेल्या दिसत होत्या. रात्री तर आणखीनच वाईट गत होते कारण मोठाले उंदीर बाहेर पडतात.










