“मुली घरच्यासाठी भाजीपाला लावतात पण आम्ही मुलं – आम्ही मात्र बाजारात विक्री करण्यासाठी भाजी लावतो,” लक्ष्मीकांत रेड्डी सांगतो.
तो अस्खलित बोलतो, त्याचा आत्मविश्वास आपल्यापर्यंत पोचतो आणि त्याच्यातला उद्योजकही लपत नाही. पंतप्रधान, विरोधी पक्षाचा नेता आणि सध्या आरोग्य मंत्री म्हणून काम करत असतानाच त्याने ही कौशल्यं प्राप्त केली आहेत.
असं असूनही लक्ष्मीकांतचं नाव फारसं कुणाच्या तोंडी नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. तो आता फक्त १७ वर्षांचा आहे.
तो आणि त्याचे सहकारी मंत्री त्यांच्या संसदेचं यश पाहण्यासाठी जमा झालेल्या लोकांशी संवाद साधतायत.
अनेक उच्चभ्रू शाळांमध्ये आदर्श संयुक्त राष्ट्रसंघ कसा असावा अशी प्रात्यक्षिकं घेतली जातात, पण इथे मात्र फक्त वर्षातून एकदा नाही तर नियमितपणे सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित असतं. इथे ते कडक इस्त्रीच्या कपड्यात परराष्ट्र धोरणावर चर्चा करत नाहीत किंवा जगाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर भले थोरले उपायही सुचवत नाहीत. उलट ते त्यांच्या म्हणजेच शिक्षण, आरोग्य इ. खात्याचे मंत्री म्हणून त्यांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर समाधान शोधत असतात. आणि या सगळ्याची अगदी प्रमुख अट म्हणजे – मोठ्यांचा कमीत कमी हस्तक्षेप.
हे सगळे मंत्री महोदय दिल्लीत मोक्याच्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये राहत नाहीत. हे सगळे तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातल्या वेप्पनपल्ली तालुक्यातल्या डोंगरदऱ्यांमधल्या नाचिकुप्पम गावचे रहिवासी. खऱ्याखुऱ्या मंत्रीमहोदयांसारख्या यांच्या बातम्या मात्र आपल्या कानी येत नाहीत.









