आपल्या रोजच्या गरजा आणि उपजीविकांसाठी जंगलांवर अवलंबून राहणाऱ्या गावकऱ्यांना हिंगलगंज, गोसाबा, कुलतली, पाथार प्रतिमा आणि बसंती तालुक्यातल्या जंगलांमधल्या वाघांपासून मोठा धोका आहे. हे तालुके सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाच्या (आणि व्याघ्र प्रकल्पाच्या) जवळ आहेत, ज्यामध्ये १७०० चौरस किलोमीटरचा कोअर एरिया आणि ९०० चौरस किलोमीटरचा बफर एरिया समाविष्ट आहे. या बफर एरियात उपजीविकांशी संबंधित काही गोष्टींना परवानगी आहे. या गावांमध्ये जंगलात जाऊन मासे किंवा खेकडे धरण्याचं आणि मध आणि लाकूड गोळा करण्याचं काम शक्यतो पुरुष करतात. त्यामुळे वाघाचा सामना झालाच तर पुरुषाचाच जीव जातो.
सुंदरबनमध्ये अशा प्रकारे किती स्त्रिया विधवा झाल्या आहेत याचा पक्का आकडा कुणाला माहित नसला तरी स्थानिक, सामाजिक संस्था आणि इतरांच्या अंदाजानुसार गेल्या ३० वर्षांत इथे किमान ३००० स्त्रिया विधवा झाल्या आहेत – म्हणजेच दर वर्षी सुमारे १००.
“गोसाबाच्या लाहिरीपूर ग्राम पंचायत क्षेत्रात [२२ गावं समाविष्ट] २०११ सालापासून, जवळ जवळ २५० स्त्रियांचे नवरे वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत,” अर्जुन मोंडल सांगतात. ते सुंदरबन रुरल डेव्हलपमेंट सोसायटी या ‘व्याघ्र विधवांच्या’ कल्याणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचं काम पाहतात. “यातल्या एकीलाही भरपाई मिळालेली नाही,” ते सांगतात.
या स्त्रियांना पश्चिम बंगाल सरकारचा वन विभाग, मत्स्य विभाग आणि राज्याच्या वैयक्तिक अपघात गट विमा योजनेमार्फत अंदाजे रु. ४-५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मात्र यासाठी अनेक अटी आहेत. अर्जुन यातल्या काहींची यादीच सादर करतातः “हा पुरुष जंगलाच्या कोअर एरियात मेलेला नसावा, त्याच्याकडे बोट परवाना प्रमाणपत्र (BLC) असायला पाहिजे आणि वन खात्याचा परवाना. याच्या जोडीला पत्नीला वेगवेगळ्या खात्यांकडे विविध इतर कागदपत्रं सादर करावी लागतात.”
कसं आहे गावातले लोक कधी तरी कोअर एरियामध्ये जातातच. अर्जुन स्वतः मच्छिमार आहेत, ते म्हणतात, “बफर झोन कुठे संपला आणि कोअर एरिया कुठे सुरू झाला ते कधी कधी आमच्या लक्षात येत नाही. सरकार फार कमी बोट परवाने वितरित करतं आणि प्रत्येकाला काही हा परवाना घेणं परवडत नाही. वन खात्याचा परवानासुद्धा त्यांची मर्जी असेल तरच मिळतो.”
त्यामुळे ज्या पुरुषांकडे बोटीचे किंवा वन खात्याचे परवाने नाहीत त्यांच्या पत्नींपुढे मोठ्या अडचणी उभ्या ठाकतात. त्यात जर का ही माणसं जंगलाच्या कोअर एरियात मरण पावली असली तर मग परिस्थिती अजूनच बिकट होते कारण गावकऱ्यांना इथे प्रवेश करण्यास मनाई आहे, परवाना असो वा नसो.
गोसाबा तालुक्यातील पाथारपारा गावच्या ४०-वर्षीय नमिता बिस्वास यांची कहाणी अशीच आहे. फेब्रुवारी २०१५ मच्छिमार असणाऱ्या त्यांच्या पतीवर, मनोरंजनवर वाघाने कोअर एरियामध्ये हल्ला केला. ते कसेबसे वाचले आणि त्यांना दवाखान्यात दाखल केलं. घरी आल्यावर काहीच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. “त्यांच्या डोक्याला जखम झाली होती त्यातला जंतुसंसर्ग बरा झाला नव्हता,” नमिता सांगते. “माझ्या नवऱ्याकडे बोटीचा परवाना होता पण पोलिसांनी माझा जबाबच नोंदवून घेतला नाही. आम्ही आमची सगळी कागदपत्रं आणि दवाखान्याची बिलं नुकसान भरपाईसाठी वन खात्याकडे सादर केली. पण अजूनही पैसे मिळालेले नाहीत. माझ्यासारख्या किती तरी विधवा बाया आहेत. सरकारने किमान आम्हाला दर महिन्याला पेन्शन तरी सुरू करावी.”