“आम्ही आमच्या मातीत कोणतीही रसायनं मिसळत नाही. कीड मारण्यासाठी मातीला विषाची गरज नसते. जर मातीचं आरोग्य चांगलं असेल तर तिचं तीच सगळं आटोक्यात आणते,” महेंद्र नौरी सांगतो. त्यांचं शेत नियामगिरी डोंगररांगांपासून १.५ किलोमीटरवर आहे. “फक्त एकच करायचं, बांधावर मोहाचं किंवा शेवग्याचं झाड पाहिजे जे पक्षी, पाली आणि बेडकांना आश्रय देतं. पिकासाठी हानीकारक असणाऱ्या किड्यांचा, अळ्यांचा ही मंडळी बंदोबस्त करतात.”
महेंद्रची दोन एकर जमीन केरंदीगुडा गावी आहे. ओदिशाच्या नैऋत्येला रायगडा जिल्ह्यातल्या बिस्समकटक तालुक्यातलं हे १०० लोकांची वस्ती असलेलं गाव. इथली बहुतेक कुटुंब कोंध आदिवासी आहेत, नौरी मात्र दोरा समुदायाचे आहेत.
३० वर्षांचा महेंद्र आणि त्याचे ६२ वर्षीय वडील लोकनाथ त्यांच्या रानात ३४ प्रकारची पिकं घेतात – त्यातही विविध वाणं मोजली तर ७२. रानाच्या वेगवेगळ्या भागात एका पाठोपाठ एक ही पिकं घेतली जातात. त्यात आहेत छोटी तृणधान्यं (सुआन आणि सिक्रा), डाळी (तूर, मूग आणि इतर), तेलबिया (जवस, सूर्यफूल आणि भुईमूग), कंद, हळद, आलं, पालेभाज्या, टोमॅटो, वांगी आणि इतरही किती तरी. “आम्हाला अन्नधान्यासाठी बाजाराची गरज नाही,” महेंद्र सांगतो.
नियामगिरीच्या डोंगरांमधून वाहणाऱ्या झऱ्यांचं पाणी इथे लोक वापरतात. दगडाचे बांध घालून पाणी शेताकडे वळवलं जातं. “गेल्या चार वर्षात इथलं हवामान साथ देत नाहीये,” लोकनाथ सांगतात, “पण या सगळ्या कठिण काळात आमच्या पिकांनी आम्हाला तारलं आहे. मी कधीही कोणाकडून कर्ज घेतलेलं नाही. आणि हे केवळ आमच्या पूर्वापार चालत आलेल्या शेती पद्धतीमुळे शक्य आहे.” या कुटुंबाचं भरणपोषण रानातल्या पिकांवरच होतं आणि काही वरकड पीक असेल तर ते मुनीगुडा आणि बिस्समकटक इथल्या आठवडी बाजारांमध्ये विकतात.





