या लेखातल्या सरकारी अधिकारी वगळता, सगळ्या व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत, जेणेकरून त्यांची ओळख उघड होणार नाही. म्हणूनच गावांची नावंही दिलेली नाहीत. दोन लेखांच्या मालिकेतला हा पहिला लेख आहे.
संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आकाशात अजूनही थोडी लाली आहे. १६ वर्षीय विवेक सिंग बिश्त आणि अजूनही काही जण सातपेरच्या त्यांच्या मुक्कामावर चाललेत. “आम्ही अजून १० दिवस इथे थांबू आणि आणखी कीडा जडी मिळतीये का ते पाहू. हा हंगाम काही आमच्यासाठी फार खास नव्हता,” त्या दिवशी गोळा केलेल्या २६ कीडा जडी दाखवत तो मला सांगत होता.
आम्ही सातपेरच्या कुरणांमध्ये होतो, समुद्रसपाटीपासून ४,५०० मीटर उंचीवर. आजूबाजूला सगळ्या बर्फाच्छादित रांगा, आणि तिथेच पस्तीस एक तंबूंच्या निळ्या ताडपत्री बर्फाळ वाऱ्यांनी उडत होत्या. मेच्या मध्यापासून आजूबाजूच्या गावातून येणारे विवेक सिंग बिश्तसारखे कीडा जडी गोळा करणारे इतर सगळे या मुक्कामी येतात. सातपेर पिथोरागढ जिल्ह्याच्या धारचुला तालुक्यात आहे, भारत नेपाळ सीमेच्या काही किलोमीटर डावीकडे.
नशीब चांगलं असेल तर हे बुरशी गोळा करणारे एका दिवशी ४० नग गोळा करू शकतात आणि नाही तर एका दिवसात १० नगही मिळत नाहीत. उत्तराखंडमध्ये जूनच्या मध्यावर मोसमी पाऊस सुरू होण्याआधी कीडा जडी गोळा करण्याचा हंगाम जवळपास संपलेला असतो. गेल्या वर्षी जूनपर्यंत विवेकचे आई-वडील, आजी-आजोबा आणि ८ वर्षांची बहीण असे सगळे त्यांच्या गावी ९०० नग घेऊन परतले होते. प्रत्येक कीडा जडीचं वजन अर्धा ग्रामहून कमी असतं आणि प्रत्येक नग १५०-२०० रुपयापर्यंत विकला जातो.
कीडा जडी किंवा ‘कॅटरपिलर फंगस’ गोळा करण्याच्या धंद्याने गेल्या दशकभरात इथल्या अनेक कुटुंबांचा कायापालट झाला आहे. भारत नेपाळ सीमेवरच्या तिबेटन पठारांवरच्या खास करून पिथोरागढ आणि चमोली जिल्ह्यात जे जास्त बघायला मिळतं. ही बुरशी गोळा करण्याचं काम नव्हतं तेव्हा इथले गावकरी पोटापुरती शेती करत होते किंवा रोजंदारी. आता जवळ जवळ एक किलो बुरशी तिच्या आकारमान आणि गुणवत्तेप्रमाणे ५०,००० रुपये ते १२ लाखांपर्यंत विकली जाते. अगदी कमीत कमी किंमत जरी मिळाली तरी गावाकडच्या एखाद्या कुटुंबाच्या सहा महिन्याच्या कमाईइतकी रक्कम तरी नक्की मिळते.
भारतातले आणि नेपाळमधले दलाल हा माल चीनमधल्या ग्राहकांना विकतात. ते पर्वतरांगांमधल्या लांबलांबच्या वाटांनी चीन आणि नेपाळमध्ये या कीडा जडीची तस्करी करतात. नाही तर उत्तराखंड राज्य पोलिस, वनखातं किंवा महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडण्याची भीती असते.
या बुरशीचं शास्त्रीय नाव आहे, ophiocordyceps sinesis. तिलाच कॉर्डिसेप्स मश्रूम असंही म्हटलं जातं. तिला ‘कॅटरपिलर फंगस’ म्हणतात कारण ती फुलपाखराच्या अळीवर बांडगुळासारखी वाढते. ती अळीला मारते आणि तिच्यावर पिवळा-करडा थर जमा करते. आणि मग, हिवाळा सुरू होण्याच्या आणि माती घट्ट बसण्याच्या अगदी आधी त्यात एक कळी तयार होते आणि ती त्या अळीचं डोकं बाहेर ढकलते. आणि मग वसंत ऋतूत – मे महिन्यात जेव्हा बर्फ वितळायला लागतो तेव्हा – अळंबीसारखी दिसणारी करड्या रंगाची बुरशी जमिनीतून वर येते.
उत्तराखंडमध्ये ही आहे किडा जडी – म्हणजे थोडक्यात किडा गवत – शेजारच्या तिबेट आणि नेपाळमध्ये यरसागुम्बा आणि चीनमध्ये डाँग चाँग झिआ चाओ. चिनी आणि तिबेटी-नेपाळी भाषेतल्या नावाचा साधारण अर्थ म्हणजे ‘हिवाळ्यातला किडा-उन्हाळ्यातलं गवत’.
या बुरशीला एवढी किंमत येते कारण तिच्यामध्ये कामोत्तेजक गुण असल्याचं बोललं जातं. आणि म्हणूनच तिला ‘हिमालयन व्हायग्रा’ असंही म्हटलं जातं. पारंपरिक चिनी औषधांमध्ये हा मौल्यवान घटक आहे. असं म्हटलं जातं की १९९३ मध्ये यारसागुम्बाची मागणी अचानक वाढली जेव्हा तीन चिनी खेळाडूंनी बीजिंग राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाच विश्व विक्रम तोडले. ते या बुरशीपासून तयार करण्यात येणारं एक टॉनिक नियमित वापरत होते.
दहा एक वर्षांनंतर हो बुरशी गोळा करण्याचं लोण भारतात पोचलं. “२००० च्या सुरुवातीला आम्ही तिबेटी खाम्पांना भारताच्या भागातल्या कुरणांमध्ये ही बुरशी शोधताना पहायचो. ते म्हणायचे की तिबेटमध्ये आता ही सापडणं दुर्मिळ झालं आहे. भारताच्या नव्या प्रदेशामध्ये याचा शोध घेण्यासाठी आमची मदत त्यांनी मागितली,” कृष्णा सिंग सांगतो. तेव्हा बाजारात कीडा जडीला बरा भाव मिळायचा. मात्र २००७ उजाडलं तोपर्यंत हा धंदा तेजीत आला होता आणि अनेक जण ही बुरशी गोळा करणाऱ्याकडे वळले होते.
“आता जे काही सुरू आहे – बुरशी वेचणं, खरेदी करणं आणि विकणं – हे सगळं पूर्णपणे बेकायदेशीर आहे,” उत्तराखंडचे मुख्य वन संरक्षक रंजन मिश्रा सांगतात. “त्यामुळे अगदी भारतीय बाजारातदेखील कीडा जडीची किंमत नक्की किती आहे हे आम्हालादेखील माहित नसतं.”
२००२ मध्ये तेव्हा अगदी बाल्यावस्थेत असणाऱ्या या धंद्यावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तराखंड शासनाने वन पंचायतींना पंचायतीच्या क्षेत्रातील रहिवासी असणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांना ही बुरशी गोळा करण्याचे परवाने देण्याचा अधिकार दिला. आजही असा परवाना असणाऱ्या व्यक्तीला वन पंचायत सोडून इतरांना ही बुरशी विकणं बेकायदेशीर आहे. २००५ मध्ये या धोरणात आणखी काही बदल करण्यात आले – अर्थात कागदावर. मात्र केवळ काहीच वन पंचायतींचं अधिकार क्षेत्र या सूचिपर्णी प्रदेशातल्या कुरणांमध्ये येतं. आणि कुणीही – गावकरी असोत किंवा पंचायत सदस्य – या धोरणाची अंमलबजावणी केली नाही.
मात्र अशी अटक किंवा कारवाई होणं दुर्मिळ आहे. “जे यात गुंतले आहेत त्यांना पकडणं सोपं नाही कारण ते या बुरशीची तस्करी करण्यासाठी खूप दुर्गम मार्ग वापरतात,” पिथोरागढचे माजी पोलीस अधीक्षक, अजय जोशी सांगतात. “गेल्या वर्षभरात आम्ही कीडा जडीसाठी एकालाही अटक केलेली नाही.”
पोलीस, वन आणि महसूल खातं यांच्यापैकी नक्की अधिकारक्षेत्र कुणाचं हेही स्पष्ट नाही. “यातलं बहुतेक क्षेत्र महसूल खात्याच्या अखत्यारीत येतं, ते कीडा जडीच्या बेकायदेशीर व्यापाराच्या केसेस वनखात्यासोबत संयुक्तपणे हाताळतात.”
मात्र, धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी, आर के पाण्डे म्हणतात, "ही कारवाई पोलिस, वन आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या केली पाहिजे. एकटं महसूल खातं कीडा जडी जप्त करू शकत नाही. गेल्या एक वर्षात आम्ही कोणताही माल ताब्यात घेतलेला नाही."
जेव्हा पोलीस किंवा इतर अधिकारी कीडा जडी पकडतात – ती अतिशय काळजीपूर्वक हवाबंद डब्यांमध्ये ठेवलेली असते – तेव्हा तपासणीसाठी ते डबे उघडतात. ही खूप झपाट्याने खराब होणारी बुरशी असल्यामुळे त्यांच्यापुढे दोन मार्ग असतात, एक तर लिलावासाठी ती वन विभागाकडे सुपूर्द करणे किंवा डेहराडूनच्या आयुष विभागाकडे किंवा जिल्हा पातळीवरच्या आयुष केंद्राकडे देणे. हे फार क्वचित घडतं आणि ही बुरशी खराब होऊन वाया जाते.
२०१७ मध्ये चमोली पोलिसांनी दोन किलो कीडा जडी बद्रीनाथ वन विभागाला दिली. मात्र त्याचा लिलाव करता आला नाही कारण तोपर्यंत ती नासून गेली होती, बद्रीनाथच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी मला सांगितलं.
या बुरशीमध्ये कामोत्तेजक गुणधर्म असल्याचं मानलं जातं त्यामुळे तिला एवढी जास्त किंमत मिळते... तसंच पारंपरिक चिनी औषधांमधला ती मौल्यवान घटक आहे
इकडे गावकरी कुठल्याही इतर कामापेक्षा मे-जून महिन्यात बुरशी गोळा करणं जास्त पसंत करतात. “अगदी सरकारी नोकरीत असणारे काही जण ‘वैद्यकीय रजा’ टाकून महिनाभर आपल्या घरच्यांसोबत या मोहिमेवर जातात,” राजू सिंग सांगतात. “घरचे जास्त जण असले तर जास्त संख्येने कीडा जडी नग गोळा करता येते. जास्त कीडा जडी म्हणजे जास्त कमाई.” फक्त म्हातारी कोतारी आणि आजारी असणारी मागे राहतात कारण त्यांना एवढी चढण चढणं होत नाही आणि खराब हवामानाचाही त्रास होतो.
लहानगी मुलं सहा सात वर्षांची झाली आणि अत्यंत कडाक्याच्या थंडीत आणि या कुरणांच्या बिकट प्रदेशात येण्यासारखी झाली की तेदेखील ही बुरशी गोळा करण्याच्या मोहिमांवर निघतात आणि तेच जास्त प्रमाणात बुरशी गोळा करतात. “मोठ्यांपेक्षा आमची नजर जास्त तेज असते. दिवसभरात आम्ही ४० तरी नग शोधून गोळा करून आणतो. मोठ्यांना यापेक्षा खूपच कमी सापडतात आणि कधी कधी तर त्यांना एकही नग सापडत नाही,” १६ वर्षांचा विवेक आत्मविश्वासाने सांगतो.
उत्तराखंडमध्ये मे महिन्यात बहुतेक शाळांना सुटी असते, त्यामुळे हिमालयाच्या कुशीतल्या या कुरणांमध्ये जायला पोरं रिकामी असतात. विवेक अगदी सात वर्षांचा असल्यापासून गेली नऊ वर्षं सातपेरला येतोय पण त्याच्या शिक्षणावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. तो नुकतीच दहावीची परीक्षा ८२ टक्के मिळवून पास झालाय. पुढे काय करायचं हे १२ वी नंतर ठरवावं असं त्याचं ठरलंय.
“घरातले सगळेच या मोहिमेवर निघतात. त्यांना जरी रांगत ही बुरशी गोळा करणं जमलं नाही तरी ते खाणं बनवू शकतात, बाकीच्यांसाठी पाणी आणू शकतात. सातपेर भागातले नऊ गावं मे महिन्यात अगदी ओस पडतात. कीडा जडीच्या हंगामात सगळी कुटुंबं बुग्यालच्या (सूचीपर्णी प्रदेशातील कुरणं) दिशेने कूच करतात,” विवेकच्याच गावचा राजू सांगतो.
डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक कीडा जडीच्या प्रदेशात कोणाला प्रवेश आहे यावर करडी नजर ठेऊन असतात. त्यांच्या गावातून आणि आजूबाजूच्या प्रदेशातून कोण येतंय, कोण जातंय यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. बाहेरच्यांना त्यांच्या भागात कीडा जडी गोळा करायची परवानगी नसते, मात्र गावकरी कधी कधी बाहेरच्या संशोधकांना जाण्याची परवानगी देतात. मला प्रवेश मिळाला कारण माझ्याकडे पिथोरागढच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांचं पत्र होतं – एक पत्रकार म्हणून त्यांनी मला दिलेल्या त्या पत्रात त्यांनी संबंधित अधिकारी आणि इतरांना त्यांच्या प्रदेशात (अनेकदा संवेदनशील अशा सीमाक्षेत्रात) प्रवेश देण्याचे आणि आवश्यक ते सहाय्य करण्याचे आदेश दिले होते.
मी एका खेचराच्या वाटेने प्रवास केला, सोबत माझा वाटाड्या होता (ज्याचं नाव सांगणंही शक्य नाही) आम्ही चढणीचा २५ किलोमीटरचा रस्ता १२ तासात पार केला आणि मुक्कामी पोचलो. या बुरशीच्या हंगामाची सुरुवात होते आणि गावकरी खेचरांवर किराणा माल लादून तंबूंमध्ये घेऊन जातात. “आम्ही एप्रिलमध्येच सातपेरला किराणा आणि इतर माल उतरवायला सुरुवात करतो – २५ किलो तांदूळ, १० किलो डाळ, कांदा, लसूण आणि मसाले – सगळं खेचरांवरनं नेलं जातं.”
हा रस्ता घनदाट जंगलांमधून जातो आणि वाटेत पाण्याचे जोरदार प्रवाह लागतात. बिबटे आणि अस्वलांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. या तंबूंपर्यंत पोचेतोवर जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी गावकऱ्यांकडे अगदी साधे कोयते आणि काठ्या असतात.
मात्र हा प्रवास एवढाच काही यातला धोक्याचा भाग नाही. कॅटरपिलर बुरशी गोळा करणंही धोक्याचं काम आहे. तीव्र उतारांवर कडाक्याच्या थंडीत कष्टाने ही बुरशी गोळा करावी लागते. त्यासाठी ओणवं झोपून, सरकत सरकत पुढे जात खालच्या गवतातून बुरशी शोधून काढावी लागते, कोपरं आणि गुडघे बर्फात रोवून हे काम करावं लागतं. या मोहिमेवरून परत आल्यावर बऱ्याच जणांना सांधेदुखी, बर्फामुळे आलेलं अंधत्व आणि श्वासाचे त्रास या समस्या जाणवतात.
२०१७ मध्ये सातपेरहून ३५ किलोमीटरवर असणाऱ्या अशाच एका कुरणामध्ये बुरशी गोळा करण्यासाठी गेलेले दोघं जण दरीत कोसळून मरण पावले. एप्रिल २०१८ मध्ये कीडा जडीच्या हंगामासाठी किराणा माल घेऊन जाणारा एक असाच दरीत कोसळून गेला. मात्र या बुरशीत इतका पैसा आहे की त्यापुढे कष्ट आणि मरणाची बातच सोडा.
अनुवादः मेधा काळे