"गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीतून पाणी काढायला मी दररोज दीड किलोमीटर चालत जाते. दिवसातून चार वेळा हेच काम करायचं. आमच्या गावात जरा पण पाणी नाही. उन्हाळा तर आणखीनच अवघड जाणार. विहिरीतलं पाणी आताच आटायला लागलंय..." त्रस्त झालेल्या भीमाबाई डांबळे म्हणतात. त्या मागील वर्षीच्या नाशिक-मुंबई शेतकरी मोर्चाप्रमाणे यंदाच्या मोर्चातही सामील झाल्या होत्या.
"मागल्या वर्षी पाऊस कमी झाला आणि माझी भातं गेली. दर वर्षी मला आमच्या पाच एकर शेतातून ८-१० पोती तांदूळ होतो. पण, या हंगामाला दोन पोतीदेखील झाला नाही. जमीन आमच्या नावावर नसल्याने आम्हाला नुकसान भरपाई पण मिळणार नाही. जमीन वन विभागाच्या मालकीची आहे," ६२ वर्षीय भीमाबाई म्हणाल्या. त्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील निरगुडे करंजाळी गावात राहतात.
भाताची कापणी झाली की भीमाबाई नागली, उडीद आणि तूर लावतात. यंदाच्या कृषी हंगामात ते सारं काही थांबलंय. म्हणून भीमाबाई यांनी दररोज ३०-४० किमी दूर असलेल्या देवळाली आणि सोनगिरी गावांत द्राक्ष, टोमॅटो आणि कांदे काढणीला जाणं सुरु केलंय. "मला दिवसाला रु. १५० मिळतात. त्यातले रु. ४० मी टमटमवर खर्च होतात. मी रोज पैसे कमावते, रोज खर्च करते," उसासा टाकत त्या म्हणतात.




