“जितकी जास्त खरेदी करू, तितका आमचा पाय कर्जात खोल चाललाय.” इति कुनरी शबरी, सावरा आदिवासी-बहुल खैरा या गावी चाळिशीतल्या कुनरी आमच्याशी बोलत होत्या.
“आमची शेणखताची, नांगराची शेती, जी आमची होती, ती आता कुणीच करत नाहीये,” त्या म्हणतात. “आता आम्ही काहीही लागलं तरी बाजारात पळतोय. बी, खत, औषध... आता तर रोजचं अन्न पण विकत घ्यायला लागतंय, पूर्वी तसं नव्हतं.”
परिस्थितिकीच्या संदर्भात बिकट अशा ओडिशाच्या डोंगराळ रायगडा जिल्ह्यात कपाशीच्या लागवडीमुळे लोक कसे परावलंबी होऊ लागलेत त्याचं चित्र कुनरींच्या बोलण्यातून उभं राहतं. इथली समृद्ध जैवविविधता, शेतकऱ्यांवरचं संकट आणि अन्न सुरक्षा या सगळ्यांवरच याचे खोल परिणाम होऊ लागले आहेत. (पहाः ओडिशात वातावरणावरच्या अरिष्टाचं बी रुजतंय) नैऋत्येकडच्या रायगडाच्या गुणुपूर तालुक्यातील पठारी प्रदेशाच्या दिशेने आम्ही उतरू लागलो आणि मग तर हे चित्र जास्तच स्पष्ट होऊ लागलं. इथेच कापसाने पहिल्यांदा आपली मुळं रोवली. आंध्र प्रदेशाच्या सीमेला लागून असलेला हा भाग म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत फक्त कपाशीची शेतं. आणि अर्थातच डोळेझाक करता येणार नाही असं – गहिरं संकट.
“आम्ही १०-१२ वर्षांपूर्वी कपास लावायला सुरुवात केली. आणि आता आम्हाला दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून आम्ही कपासच लावतोय.” गुणुपूर तालुक्यातल्या खैरा गावच्या अनेकांनी आम्हाला हे सांगितलं. या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की जास्त लागत लागणाऱ्या कापसाच्या पिकाकडे वळल्यापासून त्यांच्या स्वतःकडचं बी आणि मिश्र शेतीच्या पारंपरिक पद्धतींचा हळू हळू ऱ्हास होऊ लागला आहे.
“आमच्याकडे आमची स्वतःची पिकं आणि आमची स्वतःची शेती होती,” खेत्र सबर हा तरूण शेतकरी खंतावून सांगतो. “आंध्रावाल्यांनी येऊन आम्हाला कपास लावायला सांगितलं, आणि सगळ्या गोष्टी शिकवल्या.” इथलाच एक शेतकरी, संतोष कुमार दंडसेना पुढे सांगतो की नफा कमवण्याच्या आशेने इथले शेतकरी कप्पा किंवा कपाशीकडे वळले. “सुरुवातीचा काळ उल्हासाचा होता. आमच्या हातात पैसा खेळायला लागला. पण आता, केवळ हाल आणि नुकसान,” तो म्हणतो. “आमचा पुरता खेळ झालाय आणि सावकार मजा करतायत.”
आम्ही बोलत होतो तेव्हाच गावातल्या रस्त्यांवर जॉन डिअरीच्या ट्रॅक्टर्सची येजा चालू होती. गावातल्या देवळाच्या भिंतींवर बीटी कपाशीच्या जाहिराती ओडिया भाषेत रंगवलेल्या होत्या. गावातल्या चौकात कपाशीच्या मशागतीसाठी, पेरणीसाठी लागणारी अवजारं पहायला मिळत होती.








