जोबन लाल कांदबारी गावात डागडुजीची गरज असलेल्या एका कुह्लीच्या कडेने चालत लोकांना हाक मारताहेत. ते लोकांना मदत करायला बोलवत आहेत. "आपले फावडे अन् कुदळी घेऊन मला पोस्ट ऑफिसच्या मागे भेटा," ते म्हणतात. ती एक उबदार सकाळ आहे. पण त्यांना २० कामगार गोळा करणंही अवघड आहे. "३० वर्षांपूर्वी, खासकरून रब्बी अन् खरिपाचा हंगाम आला की कोहलींनी सांगावा धाडला की ६०-८० लोकांचा ताफा एकत्र येऊन काम करायचा," ते आठवून सांगतात. कुह्ल साधारण दोन मीटर रुंद आणि दोन मीटर खोल असते, आणि ती १०० मीटर ते एखाद किमी लांब असू शकते.
५५ वर्षीय जोबन लाल कांग्रा जिल्ह्यातील पालमपूर तहसिलातल्या कांदबारी (जनगणनेत या गावाची नोंद कामलेहर म्हणून करण्यात आलीये) या सुमारे ४०० लोकांची वस्ती असलेल्या गावचे कोहली आहेत. त्यांनी स्वतः आपल्या वडलांकडून हे काम शिकून घेतलं, मात्र त्यांचे आजोबा कोहली नव्हते. "कोणी तरी हे काम सोडायचं ठरवलं, हे काही इज्जतीचं काम उरलं नाही," ते म्हणतात. "अन् माझ्या वडलांची निवड गावकऱ्यांनीच केली असेल."
परंपरेने कुह्ल गावातील कोहलीच्या अखत्यारीत येत असे, कारण त्याला स्थानिक पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनाचं फार ज्ञान असायचं. तो कुह्ल देवीची (एक देवी, मात्र परंपरेने कोहली नेहमी पुरुषच असतो) पूजाअर्चा करी. पूर्वी, हिमाचल प्रदेशातील बऱ्याच लोकांची समजूत होती की देवी त्यांच्या कालव्यांचा सांभाळ करते. दुष्काळात देखील कालव्यांची चांगली निगा राखली, तर देवी प्रसन्न होऊन कालव्यांना पाणी द्यायची. पूर येऊ नये म्हणून कोहली एका सुफी संताची (गावकऱ्यांना त्यांचं नाव आठवत नाही) प्रार्थना करायचा, ज्यातून कदाचित कांग्रा दरीतील एकात्मतेचं दर्शन होतं.









