एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रात लॉकडाउनसारखे निर्बंध लागणार हे जवळपास निश्चित झालं आणि पुन्हा एकदा मुंबई सोडून परत जायचा निर्णय गोपाल गुप्तांनी घेतला.
असं घडलं विपरितच. त्यांचे कुटुंबीय उत्तर प्रदेशातल्या कुसौरा तालुक सहतवार या गावी जाण्यासाठी रेल्वेत बसले. हातात गुप्तांच्या अस्थींचा कलश होता.
“माझ्या वडलांच्या मृत्यूला फक्त करोना जबाबदार असं काही मी म्हणणार नाही... ते जगले जरी असते ना, त्यांचा एक पाय काढावा लागला होता,” गोपाल यांची मुलगी, २१ वर्षीय ज्योती सांगते.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोपाल यांनी थोडासा सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवायला लागला होता. पालवणीमधल्या वस्तीतल्या एका दवाखान्यातून त्यांनी काही औषधं आणली आणि त्यांना बरं वाटायला लागलं. इथेच त्यांचं दोन खोल्यांचं घर आहे.
उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातल्या बांसडीह तालुक्यातल्या आपल्या गावाहून ते जानेवारी महिन्यातच मुंबईला परतले होते. कामाची घडी जराशी बसायला लागली आणि कोविडची दुसरी लाट पसरायला लागली. “माझ्या वडलांना परत वाट पाहत बसण्याची जोखीम घ्यायची नव्हती,” ज्योती सांगते. म्हणून मग या कुटुंबाने गावी परतण्याची तयारी सुरू केली.
पण १० मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास, गोपाल यांना धाप लागायला लागली. जवळच्याच दवाखान्यात नेलं आणि त्यांना कोविडची लागण झाल्याचं निदान झालं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका मैदानात नेलं. इथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलं होतं. पण त्यांची तब्येत बिघडायला लागली आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना विनंती केली की चांगल्या सुविधा असणाऱ्या रुग्णालयात त्यांना हलवा. त्या दिवशी दुपारी गोपाल यांना कल्याणमधल्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं.
“आम्हाला खरंच समजत नव्हतं, कुठे जायचं. आम्हाला विचार करायला फारसा वेळ नव्हता. माझ्या वडलांची तब्येत बिघडत होती आणि भावाची पण,” ज्योती सांगते. तिचा भाऊ, विवेक, वय २६ याला देखील कोविडची लागण झाली होती आणि त्याला भिवंडीजवळच्या एका केंद्रामध्ये १२ दिवसांसाठी क्वारंटाइन व्हायला सांगितलं होतं.










