राजू चौधरी एक बहुरुपी आहेत – अनेक सोंगं वठवणारे. सध्या चाळीस वर्षांचे असणारे चौधरी १४ वर्षाचे असल्यापासून हे काम करतायत. “मी किती तरी काळापासून हेच करतोय,” ते सांगतात. “आमचे बापजादे बहुरुपी होते, आणि आता माझी मुलंदेखील सोंगंच वठवतात...”
राजू बेदिया समुदायाचे आहेत. ही एक आदिवासी जमात आहे आणि पश्चिम बंगालच्या आदिवासी लोकसंख्येपैकी ५.८ टक्के बेदिया आदिवासी आहेत (जनगणना २०११). बिरभुम जिल्ह्याच्या लाबपूर तालुक्यातल्या बिशयपूर या त्यांच्या गावात ४० बेदिया घरं आहेत. आणि सगळे पिढीजाद बहुरुपी आहेत.
या चित्रफितीत राजू ‘तारा सुंदरी’ ही काल्पनिक भूमिका वठवतायत. स्थानिक मिथकांमध्ये ती कालीचं एक रूप आहे. या कथेतून ते बरद्वानच्या राजाची गोष्ट सांगतात – या कथेत खूप सारी भर पडत गेली आहे, अनेक नवनवे शब्द आणि म्हणी, यमकांमधून, ज्यातले काही बंगालीत आहेत - ही कथा सांगितली जाते. मे महिन्याच्या (सन २०१७, जेव्हा ही चित्रफीत तयार केली होती) ४० अंश तलखीतही पायात चाळ बांधून ते प्रचंड जोशात नाचतात, टीपेच्या स्वरात गातात, हातात फक्त एक लाकडी काठी, ठेक्यासाठी.



