“सगळेच पेरतायत. त्यामुळे आम्ही पण,” रुपा पिरिकाका सांगतात, काहिशा अनिश्चित स्वरात.
काय पेरतायत तर जनुकीय बदल केलेलं बीटी कपाशीचं बी जे आता स्थानिक बाजारात, अगदी आपल्या गावातही मिळू लागलंय. आणि सगळे म्हणजे ओडिशाच्या नैऋत्येला असलेल्या रायगडा जिल्ह्यातले त्यांच्यासारखे इतर शेतकरी.
“त्यांच्या हातात आता पैसा यायला लागलाय,” त्या म्हणतात.
चाळिशीच्या पिरिकाका कोंध आदिवासी जमातीच्या शेतकरी आहेत. दर वर्षी, गेली दोन दशकं, त्या डोंगरउतारावरची जमीन 'डोंगर चास'साठी – शब्दशः डोंगरावरच्या शेतीसाठी तयार करत आल्या आहेत. गेल्या अनेक शतकांपासून या प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या ज्या पद्धती विकसित केल्या त्याच पुढे नेत पिरिकाका डोंगरजमिनीच्या तुकड्यांमध्ये आदल्या वर्षीच्या कापणीनंतर जतन करून ठेवलेलं वेगवेगळ्या प्रकारचं शुद्ध बी पेरत असत. यातून सहा प्रकारची धान्यपिकं हाती येत असत - मंड्या आणि कणगुसारखी तृणधान्यं, तूर आणि उडदासारख्या डाळी तसंच चवळी, कारळं आणि तीळ.
या वर्षी जुलै महिन्यात पहिल्यांदाच पिरिकाकांनी बीटी कापूस पेरायचं ठरवलं. आम्ही त्यांना भेटलो तेव्हाच त्या बिषमकटक तालुक्यातल्या त्यांच्या गावी डोंगर उतारावर गडद गुलाबी रंगाचं, रसायनात बुडूवन सुकवलेलं बीटीचं बी टोबत होत्या. आदिवासींच्या शेती परंपरांमध्ये या प्रकारे कपाशीचा शिरकाव लक्षणीय होता, त्यामुळेच आम्ही त्यांना या बदलाविषयी विचारण्याचं ठरवलं.
“हळदीसारख्या इतर पिकातही पैसा आहे,” पिरिकाका मान्य करतात. “पण तसं कुणीच करत नाहीये. सगळे जण मंड्या सोडून... कपाशीच्या मागे चाललेत.”
फक्त १६ वर्षांत रायगडा जिल्ह्यातला कपाशीचा पेरा ५,२०० टक्क्यांनी वाढला आहे. २००२-०३ मध्ये अधिकृत आकडेवारीनुसार कपाशीखाली १,६३१ एकर क्षेत्र असल्याची नोंद आहे. २०१८-१९ मध्ये हाच आकडा ८६,९०७ एकर असल्याचं जिल्हा कृषी कार्यालयाच्या माहितीतन समजतं.
सुमारे १० लाख लोकसंख्या असणारा, कोरापुट विभागातला रायगडाचा प्रेदश जगातल्या सर्वात समृद्ध जैवविविधता असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे आणि या भागात भाताचे असंख्य वाण असल्याचा इतिहास आहे. १९५९ साली केंद्रीय चावल अनुसंधान संस्थानाने (Central Rice Research Institute) केलेल्या सर्वेक्षणांनुसार या भागात तेव्हादेखील भाताचे १,७०० वाण होते. आता या वाणांची संख्या २०० हून कमी झाली आहे. भातशेतीचा उगमच या भागात झाला असावा असा काही संशोधकांचा विश्वास आहे.








