मंगला हरिजन आजवर कामानिमित्त कुठे कुठे गेलीये ते प्रत्येक गाव तिला आठवतं. "कुंचुर, कुरागुंड, क्याटनकेरी… मी वर्षभर रत्तिहळ्ळीला पण गेली होती," ती कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर तालुक्यातील गावांची नावं सांगत होती. मंगला एक शेतमजूर असून शेतावर रोजंदारी करण्यासाठी रोज आपल्या गावाहून १७-२० किमी अंतर प्रवास करते.
"गेली दोन वर्षं मी कोननतळीला जातेय," ती सांगते. कोननतळी आणि मंगलाचं मेनशिनाहल ही दोन्ही गावं हावेरीच्या राणीबेन्नुर तालुक्यात येतात. हिरेकेरुर तालुका तिथून ३५ किमी लांब आहे. मंगला आणि मेनशिनाहलच्या शेजारी असलेल्या मडिगा केरी – अर्थात मडिगा या दलित समाजाची वस्ती – येथील महिला ८-१० जणींच्या गटात कामासाठी बाहेर पडतात.
प्रत्येकीला दिवसाला १५० रुपये मिळतात, पण वर्षाचे काही महिने हाताने परागीकरण करण्याच्या कामाचे त्यांना अधिकचे ९० रुपये मिळतात. या कामासाठी त्या जिल्हाभर फिरतात आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतात काम असतं ते शेतकरी त्यांची ऑटोरिक्षाने येण्या-जाण्याची सोय करतात. "ऑटोवाला दिवसाचे रू. ८००-९०० मागतो, म्हणून ते [शेतकरी] आमच्या मजुरीतून १० रुपये कापतात," मंगला म्हणते, "आधी प्रवास करायला ऑटो नसायचे. आम्ही पायीच चालायचो."
काटक बांधा आणि दिसायला बारीक असलेली ३० वर्षीय मंगला, तिचा नवरा आणि त्यांची चार मुलं असे सगळे एका खोलीच्या कुडाच्या झोपडीत राहतात. मंगलाचा नवराही रोजंदारीवर कामाला जातो. त्यांच्या झोपडीत एक बल्ब पेटलाय. खोलीचा एक कोपरा स्वयंपाकासाठी आणि एक कपडे ठेवण्यासाठी. दुसऱ्या बाजूला भिंतीला लागून स्टीलचं मोडकं कपाट आहे, आणि मधली जागा जेवण आणि झोपी जायला असते. बाहेर कपडे धुण्यासाठी एक दगड आणि भांडी घासायची जागा.










