'तुमचा आवडता विषय कोणता?' हा भारतीय शालेय विद्यार्थ्यांच्या वर्गात नेहमीच विचारला जाणारा एक निरस प्रश्न, आम्ही देखील विचारला. वर्गातील विद्यार्थ्यांनी एकमुखाने उत्तर दिले, "इंग्रजी". समोरच्या बाकांवर बसलेल्या दोन विद्यार्थ्यांनी "इंग्रजी" म्हंटलं की, वर्गातील प्रत्येक कच्चा-बच्चा तेच उत्तर देतो. पहिल्या दोन विद्यार्थ्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही म्हणजे तेच बोलायचं हे मुलांना चांगलंच माहित असतं.
पण ही कोणतीही सामान्य शाळा नाही, तर ईडालिप्पारामधील एक शिक्षकी, एकत्रीकृत आदिवासी विकास प्रकल्प शाळा आहे. केरळ मधील सर्वांत दुर्गम भागात आणि एकमेव आदिवासी पंचायत असलेल्या ईडमालकुडीमध्ये ही शाळा वसलेली आहे. शाळेच्या बाहेर कुठेही आपल्याला इंग्रजीत बोलताना कोणीही आढळणार नाही. इंग्रजीत इथे एखादा बोर्ड, पोस्टर किंवा फलकही आढळणे अवघड आहे. तरीही विद्यार्थी सांगतात इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय आहे. ईडुक्की जिल्ह्यातील इतर अनेक शाळांप्रमाणेच, या शाळेतही इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग एकत्र एकाच खोलीत भरवले जातात. एस. विजयलक्ष्मी खरोखरच एक असामान्य शिक्षिका आहेत. तुटपुंजा पगार, प्रचंड काम, अशक्य आणि अवघड परिस्थितीतही विद्यार्थ्यांसाठी एवढ्या समर्पित होउन त्या शाळा चालवतात.
इंग्रजी म्हणणार्यांमध्ये, "गणित" आवडता विषय म्हणणारा एक छोटासा शूरवीर विरोधक उभा राहिला. आम्ही त्याला लक्ष्य करुन, तुझं गणिताचं कौशल्य दाखव पाहू, अशी मागणी केली. आणि त्याने ती पूर्ण केली. ताठ मानेने, छाती फुलवून त्याने एका दमात, १ ते १२ चे पाढे म्हणून दाखविले - शाबासकी मिळो ना मिळो. तो आणखी पाढे म्हणणार होता पण आम्हांला त्याला थांबवावं लागलं.





