केसांना चोपून तेल लावून घट्ट वेणी घातलेली. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं. पायात हवाई चपला आणि टाचांच्या जरा वर नेसलेली खादीची साडी. दिवसभराच्या कामासाठी एकदम सज्ज असं त्यांचं रुप. पण आज त्या आम्हाला पिन्नाथ रांगांच्या पल्याड असलेल्या रुद्रधारी धबधब्यावर- जिथे कुमाऊं भागातील कोसी नदीचा उगम आहे - घेऊन जाणार आहेत.
आम्ही दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये कौसानीत भरणाऱ्या लोक उत्सवात भाग घेत आहोत. कौसानी हे उत्तराखंडच्या बागेश्वर आणि अल्मोरा जिल्ह्यांच्या वेशीलगत वसलेलं, जवळपास २,४०० लोकांची वस्ती असलेलं गाव. बसंती सामंत, किंवा बहुतेक लोक म्हणतात तसं बसंती बहन, वय ६०, या प्रसंगी वक्त्या आहेत. आमच्या गटाचं नेतृत्व करायला त्यांची अशीच निवड झाली नाहीये.
काही वर्षांपूर्वी, त्यांनी कोसी नदी वाचवण्यासाठी - एका गटात कौसानीच्या आजूबाजूच्या १५-२० स्त्रिया - असे २०० गट तयार करून एक चळवळ उभारली होती. १९९२ मध्ये सेकंदाला ८०० लिटर या दराने वाहणारा नदीचा प्रवाह २००२ च्या सुमारास आटून ८० लिटर वर आला होता. आणि तेव्हापासून सामंत आणि कौसानीच्या स्त्रियांनी कोसीचं पाणी वाचवण्यासाठी अतोनात कष्ट घेतले.
२००२ मध्ये, सामंत यांनी स्त्रियांना जिवंत झाडं तोडणं बंद करायला आणि त्याऐवजी मोठ्या पानांची, देशी बांज जमातीची झाडं लावायला प्रोत्साहित केलं. स्त्रियांनी पाणी जपून वापरायची आणि वणवे थांबवण्याची प्रतिज्ञा केली. सामंत यांनी पर्यावरणाचा सांभाळ करणारा एक भगिनीभाव या स्त्रियांमध्ये निर्माण केला आणि गेल्या अनेक वर्षांपासून, त्यांची एकजूट कायम राहिलीये, अगदी आपल्या घरातल्या लढ्यांसाठीही त्या एकमेकींकडून बळ घेत राहिल्या आहेत.
पण, हे सारं काही होण्यापूर्वी, सामंत यांना स्वतःची लढाई लढावी लागली होती.
“माझं जगणं डोंगरासारखंच होतं - कठीण आणि नुसत्या चढाचं,” त्या म्हणतात. वयाच्या १२ व्या वर्षी इयत्ता ५वी पूर्ण झाल्यावरच बसंती यांचं लग्न लावून देण्यात आलं. नंतर त्या आपल्या सासरी, पिथोरागढ जिल्ह्यातील थारकोट गावी रहायला गेल्या. त्या १५ वर्षांच्या होत नाहीत तोच शालेय शिक्षक असणारे त्यांचे पती मरण पावले. “सासू म्हणायची मीच त्यांचा घास घेतला,” त्या सांगतात.





