माझा जन्म नर्मदा जिल्हातील महुपडा गावातील भिल्ल वसावा गोतात झाला. माझं गाव महाराष्ट्राच्या सीमेवरील (त्या काळी बॉम्बे प्रांताचा भाग) वसलेल्या त्या २१ गावांपैकी एक होतं. महागुजरात आंदोलनानंतर (१९५६-१९६०) जेव्हा भाषेच्या आधारावर गुजरात राज्याची स्वतंत्र स्थापना झाली, तेव्हा आमचं गाव गुजरातमध्ये सामील केलं गेलं. माझ्या आईवडिलांना मराठी कळायचं आणि ते ती भाषा बोलायचे देखील. तापी आणि नर्मदा नद्यांच्या मधलं क्षेत्र हे भिल्ल आदिवासींचं घर आहे. ते देहवली भिली ही भाषा बोलतात. तापीच्या दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या जळगावपर्यत कोणत्या ना कोणत्या रुपात देहवली बोलली जाते. आणि गुजरातमध्ये अगदी सातपुडा पहाडामध्ये असलेल्या मोल्गी आणि धडगाव गावापर्यंत लोक ही भाषा बोलतात. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा हा मोठा प्रदेश आहे.
मी देहवली भिली मध्ये लिहितो, आणि ज्या लोकांना आमच्याबाबत जास्त माहीत नाही ते नेहमी आमच्या गोताद्वारे आमच्या भाषेची ओळख करून देतात. म्हणून कधी–कधी ते म्हणतात की मी वसावीमध्ये लिहितो, कारण माझे कुटुंब वसावा गोताचे आहे. गुजरातचे आदिवासी ज्या भाषेत बोलतात त्या भाषेपैकी ही एक भाषा आहे. गुजरातच्या डांगमध्ये भिल्ल लोक वारली बोलतात. इथले मूळ निवासी भिल भिली बोलतात तर जे कोकणातून आले ते कोकणी बोलतात. वलसाड मध्ये ते वारली आणि धोडिया बोलतात. व्यारा आणि सुरत मध्ये गामित बोलतात, उच्छालकडे चौधरी, निजार मध्ये ते मावची बोलतात. निजार आणि सागबाराच्या मध्ये भिल देहवली बोलतात. या शिवाय आंबुडी, कथाली वसावी, तडवी, डुंगरा भिली, राठवी, पंचमहली, डुंगरी गरासिया वगैरे भाषा आहेतच...
प्रत्येक भाषेत लपलेल्या खजिन्याची कल्पना करा, जणू काही एका छोट्या बीमध्ये दडलेलं विपुल जंगल. त्यातलं साहित्याचं भंडार, ज्ञानाचे स्त्रोत, वैश्विक दृष्टी डोकावते. मी आपल्या लेखणीतून या खजिन्याची नोंद घेण्याचा आणि जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे.


