मीरामणभाई चावडा यांच्या खाद्यावर वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी कुटुंब प्रमुखपदाची जबाबदारी येऊन पडली. आई-वडिलांच्या निधनानंतर, मोठा मुलगा या नात्याने आपल्या भावंडांचं - दोन भाऊ आणि दोन बहिणींचं संगोपन करणं त्यांचं कर्तव्य बनलं. ते मातीची भांडी तयार करीत व ती गावकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना विकून घर चालवीत. हे व्यापारी त्यांनी बनवलेली भांडी आसपासच्या गावात विकत. आसपासच्या १० गावांमध्ये मीरामणभाई हे एकटेच कुंभार होते.
आज अनेक दशकांनंतरही, मीरामणभाई फिरत्या चाकाजवळ बसतात आणि चिखलाच्या गोळ्यातून सुंदर भांडी घडवतात. या मरणासन्न कलेच्या आविष्कारासाठी एक तास राबल्यावर त्यांना साधारण १०० रुपये मिळतात. ते दिवसातून चार तास काम करतात. पण त्यांचं उत्पन्न त्यांनी बनवलेल्या भांड्यांच्या विक्रीवर अवलंबून असतं. नशीब जोरावर असेल त्या दिवशी त्यांना चार-पाच भांड्यांच्या विक्रीतून ४५० रुपयांपर्यंत मिळतात, पण असे सुदैवी दिवस दुर्मिळ असतात.
“पूर्वी लोक धान्य, डाळी, कपडे, बूट (इत्यादी) देऊन भांडी घेत. खरंच खूप चांगले दिवस होते ते,” कधीकाळच्या आपल्या भूतकाळात हरवत मीरामणभाई म्हणतात. ते भूमिहीन असल्याने त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अशाच प्रकारे भागत असे.
मीरामणभाईचा जन्म गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील मेखाडी गावात झाला. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर, ते जुनागढ जिल्ह्यातील चखवा या गावी स्थलांतरित झाले. जुनागढ त्या काळी नवाबांच्या अधिपत्याखाली होतं. “मी स्वयंपाकघरात भरपूर काम करायचो. नवाब त्यांच्या समारंभातील स्वयंपाकासाठी माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवीत,” ते अगदी जोषात येऊन सांगतात.
मीरामणभाई नवाबांसाठी भांडी बनवत. “नवाब जमाल बख्ते बाबी जेव्हा कधी मला बोलावीत, तेव्हा मी ७१ किलोमीटर चालत जात असे. इथून सकाळी लवकर निघून संध्याकाळी जुनागढला पोहोचत असे. मला रेल्वेचं १२ आणे भाड परवडत नसे कारण कुटुंबात मी एकटाच कमावता होतो आणि माझ्या दोन बहिणींची लग्ने व्हायची होती,” ते सांगतात.
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते ३३ वर्षांचे असल्याचे मीरामणभाई यांना आठवतं. यावरून त्यांचं वय आज १०० वर्षांहून अधिक आहे असं म्हणायला हरकत नाही. या वयातही ते भांडी बनवण्याचं काम कसं करू शकतात? “प्रत्येक जण विशिष्ट काम करण्यासाठी जन्माला आलेला असतो. कुठल्याही परिस्थितीत त्याला ते काम करावंच लागतं, जणू ते काम करणारा तो एकटाच असतो. माझं बालपण, तरुणपण आणि नंतरची, जबाबदारीची वर्ष या कलेच्या जोपासनेत आणि नवनिर्मितीत गेली. मग आताच मी का थांबावं? मी या कलेसोबतच जगलो आणि कलेसोबतच मरेन.” मातीची भांडी आणि अवजारे असलेल्या आपल्या छोट्याश्या अंगणात जाता जाता मीरामणभाई म्हणतात.