त्यांना पाहिलं की वाटतं ते नुकतेच डिकन्सच्या कादंबरीतून अवतरले आहेत. कुलुपबंद घरांच्या रांगेतल्या आपल्या घराच्या व्हरांड्यात बसून ७१ वर्षांचे एस. कंदासामी जिथे आपला जन्म झाला, लहानाचे मोठे झालो त्या गावात आपल्या आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करतायत. आणि या काळात त्यांना सोबत करण्यासाठी इथे मीनाक्षीपुरममध्ये कुणीही नाही, इथली उरलेल्या ५० कुटुंबांमधलं शेवटचं कुटुंब – खेदाची बाब म्हणजे त्यांचंच – पाच वर्षांपूर्वी इथून बाहेर पडलं.
या एकाकी गावामधलं त्यांचं राहणं म्हणजे प्रेमाची, कुणी तरी हरपण्याची, आशेची आणि दुःखाची कथा आहे. इथल्या भीषण पाणी टंचाईपुढे हात टेकत मीनाक्षीपुरमचे सगळे रहिवासी इथून बाहेर पडले. मात्र कंदासामी मात्र “वीस वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने वीरालक्ष्मीने जिथे शेवटचा श्वास घेतला, तिथे मला माझे उरलेले दिवस व्यतीत करायचे आहेत” यावर ठाम होते. नातेवाइकही किंवा मित्रमंडळीही त्यांचं मन वळवू शकली नाहीत.
“बाकी सगळी कुटुंबं गेली, शेवटी माझ्या घरची मंडळी बाहेर पडली,” ते सांगतात. पाच वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या धाकट्या मुलाचं लग्न होऊन तो इथून बाहेर पडला, तेव्हा तमिळ नाडूच्या थूथुकोडी जिल्ह्यातल्या श्रीवैकुंठम तालुक्यातल्या या गावचे ते एकमेव रहिवासी झाले. पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या या जिल्ह्यात मीनाक्षीपुरममध्ये हे दुर्भिक्ष्य जास्तीच तीव्र होतं.
“मला नाही वाटत लोक फार जास्त दूर गेले असतील. दहा कुटुंबं सेखरकुड्डीला गेलीयेत.” इथून केवळ ३ किमी लांब असणाऱ्या या गावातही पाण्याची टंचाई आहेच, कदाचित इथल्यापेक्षा थोडी कमी. मात्र इथल्यापेक्षा तिथे बरं चाललेलं दिसतंय आणि खरं तर तिथे भरपूर वर्दळ आणि कायकाय चालू होतं. मीनाक्षीपुरममध्ये मात्र केवळ शांतता. इथल्या कुणाला जर या एकाकी गावाचा पत्ता विचारला तर लोक अचंबित होतात. “तुम्हाला तिथे देवळात जायचंय का? तिथे त्या गावात बाकी काहीही नाहीये.”








