चित्तरंजन राय पश्चिम बंगालच्या गदंग गावातून २०१५ साली वयाच्या २८ व्या वर्षी दूर केरळला जायला निघाला, चांगल्या मजुरीसाठी. तिथे वेगवेगळ्या बांधकामावर त्याने गवंडी काम करून पैसे साठवले आणि भाड्याने घेतलेली आठ बिघा जमीन कसण्यासाठी तो परतला. याआधी त्याने आपल्या कुटुंबाच्या रानात काम केलं होतं. आता त्याला स्वतःच्या हिमतीवर बटाट्याची शेती करून पहायची होती.
“ही जमीन पहिल्यांदाच कसली जात होती त्यामुळे कष्टही खूप पडले आणि पैसाही,” त्याचे काका, पन्नाशीचे उत्तम राय सांगतात. चांगला माल आला तर नफा होईल या आशेने चित्तरंजनने गावातल्या सावकारांकडून आणि बँकेकडून कर्जं घेतली – हळू हळू हा आकडा ५ लाखांपर्यंत पोचला – तीही “खूप जास्त व्याजाने,” उत्तम सांगतात. पण मग २०१७ साली प्रचंड पावसामुळे सगळ्या रानात पाणी साचून राहिलं. पीक वाया गेलं. आणि नुकसान सहन न झाल्यामुळे ३१ जुलै रोजी ३० वर्षांच्या चित्तरंजनने घरी फास लावून घेतला.
“त्याच्या आई-वडलांना त्याचं लग्न लावून द्यायचं होतं,” जलपायगुडी जिल्ह्याच्या धुपगुरी गावात शेती करणारे चिंतमोहन रॉय सांगतात. ते त्यांच्या पाच बिघा (१ बिघा म्हणजे ०.३३ एकर) जमिनीत बटाटा, धान आणि तागाची शेती करतात. “तो बँकेचं कर्ज घ्यायला पात्र नसल्यामुळे त्याच्या वडलांनी त्यांच्या नावावर कर्ज घेतलं होतं.” आता मुलगा तर गेलाच आणि त्याचे साठीचे वडील कर्ज फेडायसाठी धडपडतायत आणि त्याची आई आजारी आहे.
चिंतमोहन यांच्या कुटुंबात देखील इतक्यात एक आत्महत्या झाली आहे. “माझा भाऊ फार साधा होता, त्याला तो ताण सहन झाला नाही आणि २३ जून २०१९ रोजी त्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली,” ते सांगतात. त्यांचे बंधू गंगाधर ५१ वर्षांचे होते.
“तो त्याच्या ५ बिघ्यात बटाटा करायचा,” ५४ वर्षीय चिंतमोहन सांगतात. “त्याने [बँक, खाजगी सावकरा आणि दुकानदारांकडून] कर्जं घेतली होती. गेले काही हंगाम सलग घाटाच होत होता, आणि परिस्थितीच अशी झाली होती की तो स्वतःला सावरू शकला नाही...”
गंगाधर यांची बरीचशी जमीन खाजगी सावकारांना गहाणखत करून दिलेली आहे. त्यांच्यावर सगळं मिळून सुमारे ५ लाखांचं कर्ज होतं. त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत आणि त्यांच्या तिघी मुलींपैकी थोरली कॉलेजमध्ये आहेत. “आम्ही भाऊ आणि गंगाधरच्या सासरचे मिळून कसं तरी करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतोय,” चिंतमोहन सांगतात.







