महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा आपण पास झालोय हे कळाल्यानंतर काही तासातच संतोष खाडेने आपल्या एका मित्राला बीडहून १८० किमी दूर सोलापूरला घेऊन चल अशी विनंती केली. तिथे पोचल्यावर हवेवर डोलणाऱ्या हिरव्या गार ऊसाच्या फडात खोप कुठे ते आधी शोधली. बांबू, गवताचा पेंढा आणि ताडपत्री किंवा चवाळ बांधलेली ही तात्पुरती झोपडी. पुढच्या काही मिनिटात त्याने ती खोप मोडून तोडून टाकली. गेली ३० वर्षं दर वर्षी ऊसतोडीसाठी सहा महिने याच खोपीत त्याचे आई-वडील मुक्कामी असायचे.
“यापुढे माझ्या आई-बापाला परत कधी ऊसतोडीला जावं लागणार नाही या गोष्टीचा आनंद मी भटक्या जमातीच्या ड प्रवर्गातून पहलि आलो यापेक्षाही किती तरी जास्त होता,” संतोष सांगतो. आपल्या ३ एकर कोरडवाहू रानाला लागूनच असलेल्या घराच्या अंगणात तो प्लास्टिकची खुर्ची टाकून बोलत होता.
ही बातमी कळाली तेव्हा डोळ्यातून आधी आनंदाश्रू वाहिले होते आणि त्यानंतर पोटभर हसू. गेली ३० वर्षं बीडच्या पाटोद्याहून ऊसतोडीसाठी सोलापूरला स्थलांतर करणारे ऊसतोडणी कामगार त्याचे आई-बाप. त्याच्या सावरगाव घाट गावातली ९० टक्के कुटुंबं ऊस पिकवणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात दर वर्षी ऊस तोडणीला जातात, तो सांगतो.
वंजारी समाजाचा संतोष २०२१ साली एमपीएसची परीक्षा पास झाला. आणि नुसता पास नाही झाला, खुल्या यादीत राज्यात सोळावा आणि भटक्या जमाती-ड या प्रवर्गात तो पहिला आला.
“माझ्या आई-बापानं वर्षामागून वर्षं इतके हाल काढले त्याचं हे फलित आहे. जनावराचं जगणं कसं असतं, तसंच यांचं जगणं आहे,” तो म्हणतो. “माझं पहिलं टारगेट होतं त्यांचे हाल थांबवणं. चांगलीशी नोकरी शोधायची जेणेकरून त्यांना ऊसतोडीसाठी गाव सोडून जावं लागणार नाही.”







