२३ मे २०२५ रोजी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये रस्ता अपघातात राधेश्याम बिष्णोईे मरण पावले. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेल्या भदरिया माता ओरण या देवराईमध्ये शिकारी आले आहेत असा निरोप त्यांना मिळाला आणि त्यासाठीच ते रात्री उशीरा बाहेर पडले होते. आययूसीएनच्या यादी रेड लिस्टमध्ये म्हणजेच धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीमध्ये काळविटांचा समावेश होतो. राधेश्याम यांच्यासोबत असलेले तीन वनविभाग अधिकारी देखील या अपघातात मरण पावले.
पोकरणचे रहिवासी असलेले राधेश्याम उत्तम वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गवादी होते. सोबतच गोडावन म्हणजेच माळढोक आणि चिंकारा म्हणजे काळवीट तसंच अन्य पशुपक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचं संवर्धन करण्यासाठी ते प्रचंड काम करत असत. तो त्यांचा ध्यास होता. जे त्यांच्या संपर्कात येत त्यांना गरज लागली तर आपल्याकडचं ज्ञान आणि छायाचित्रं अगदी सढळ हस्ते त्यांनी देऊ केली आहेत. ढोलिया गावी आपली पत्नी, दोन चिमुकली मुलं आणि आईसोबत राहणारे राधेश्याम केवळ तीस वर्ष वयात गेले. त्यांचं जाणं एक मोठी पोकळी मागे ठेवून गेलं आहे. त्यांची कमी भरून निघणार नाही हे निश्चित.
पुढील मजकूर राधेश्याम बिष्णोई यांना समर्पित करत आहोत.
---
पांढरे ठिपके असलेली पिसं खुरट्या गवतात विखुरलेली दिसतात.
अंधारून आलंय, तशाच अंधुक उजेडात राधेश्याम बिष्णोई चार बाजूंनी फिरून पाहतो. मनातली शंका खोटी ठरावी असं त्याला मनापासून वाटतंय. “पिसं कुणी उपटली आहेत असं वाटत नाही,” तो जोरात म्हणतो. आणि त्यानंतर फोन करून कुणाशी तरी बोलणं सुरू होतं, “तुम्ही येताय का? मला तर नक्कीच वाटतंय...” फोनवरच्या पलिकडच्या व्यक्तीला तो सांगू लागतो.
आकाशात गंध ओढल्यासारख्या २२० किलो व्हॅटच्या तारा चुनचुन आवाज करत होत्या. संध्याकाळच्या अंधारत जाणाऱ्या आभाळात त्याच आता काळ्या फटकाऱ्यांसारख्या दिसू लागल्या होत्या.
माहिती गोळा करण्याचं आपल्याला दिलेलं काम आठवल्याने २७ वर्षीय राधेश्याम आपला कॅमेरा काढतो आणि ‘गुन्हा’ घडलाय तिथले अनेक फोटो काढतो. काही जवळून तर काही थोडेसे लांबून.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा एकदा त्याच ठिकाणी येतो – जैसलमेर जिल्ह्यातल्या खेतोलईजवळच्या गंगाराम की धाणी या वस्तीपासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर.
आता मात्र कसलीच शंका मनात राहत नाही. पिसं ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच राजस्थानात गोडावण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळढोक पक्ष्याचीच आहेत.

















