सत्यभान आणि शोभा जाधव ट्रॅक्टरवर बसण्याच्या तयारीतच आहेत. “जितकं शक्य आहे तितकं सोबतच घेऊन निघताव आम्ही – बाजरी, पीठ-मीठ, स्वैपाकाचं सगळं सामाईन,” सत्यभान सांगतात, “म्हणजे मग प्रवासात किंवा बेळगावमध्ये ज्यादा खर्च करावा लागत नाही.”
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातलं १२०० लोकसंख्येचं बोडखा हे अडनिडं गाव. ऑक्टोबर महिन्यातली दुपार, हवेत चांगलाच उष्मा आहे. गावातले बरेच जण याच तयारीत आहेत – कपडे, भांडीकुंडी आणि वाटेत खायला चपात्या, आणि बाकी बऱ्याच सामानाची बांधाबांध आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये सामान लादणं सुरू आहे. आपल्या साध्यासुध्या घराची लाकडी दारं बंद करून साखळी आणि कुलुप पक्कं बसलंय ना याची दोनदोनदा खातरजमा केली जातीये. घरदार पुढचे पाच महिने त्यांच्याच भरोशावर असणार आहे.
हा असा घर सोडून निघण्याचा सोहळा दर वर्षीचाच आहे. दर वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास मराठवाड्याच्या एकट्या बीड जिल्ह्यातले सव्वा लाख (जिल्हाधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार) शेतमजूर आणि शेतकरी पुढचे ४-५ महिने पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या उसाच्या फडांमध्ये तोड करण्यासाठी निघतात. आपल्या गावात हाताला काम नाही, वाढता उत्पादन खर्च, बाजारभावाची हमी नाही, कर्जाची सोय नाही, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि इतरही अनेक गोष्टींमुळे शेती संकटात सापडलेली... त्यामुळे त्यांना बाहेर पडावंच लागतं.








