या पाड्यांवर हिरवंशार पाणी आणि सभोवती नारळाची आणि सुपारीची झाडं दिसतात. घरांबाहेर कोंबड्या हिंडतायत आणि सूर्य माथ्यावर येण्याआधी मुलं शाळेतून घरी परततायत. आणि कधी कधी कोलकात्याच्या गलीफ स्ट्रीट पेट बाजारात मासे विकत घेण्याआधी त्यांची जरा जवळून ओळख करून घेण्यासाठी म्हणून काही गिऱ्हाईकही गावात चकरा मारत असतात. दर रविवारी कोलकात्याच्या या बाजारात किरकोळ विक्रेते एकत्र येतात.
कांदोन यांच्या घरामागे त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा माशांचा तलाव जाळीने झाकला आहे. इतरही मत्स्य शेतकऱ्यांनी अशीच सोय केलीये. “पावसाळ्यात माशाची पैदास जोरात असते त्यामुळे तलावाची आधीच मशागत करून ठेवावी लागते,” ते सांगतात. त्यांच्या लहानशा घरात एका खोलीत घरात वाढवाव्या लागणाऱ्या प्रजातीचे मासे जोपासलेले आहेत. अनेकदा अंडी नष्ट होतात त्यामुळे बाजारात किती माशांची विक्री होते ते नक्की नसतं. सरासरी पाहता आठवड्याला १,५०० असा आकडा आहे. “या धंद्यात कमाई निश्चित नसते. महिन्याला ६,०००-७,००० रुपयांच्या वर काही जात नाही,” कांदोन सांगतात.
माशांची पैदास आणि बाजारात विक्रीचं कौशल्य उदयरामपूरमध्ये पिढीजात आहे. घरातल्या सगळ्यांनाच माशांची काय काळजी घ्यायची ते माहित असतं. प्रत्येकालाच माशांमधले आजार आणि त्यावर काय उपचार करायचे याची माहिती असते. “जेव्हा ते आजारी असतात किंवा काही इजा झालेली असते तेव्हा ते शक्यतो पाण्याच्या पृष्ठभागापाशी तरंगत राहतात,” कांदोन सांगतात. “आणि ते खाणं थांबवतात. काही फिकुटतात आणि त्यांची शेपटी पांढुरकी पडते.” आमतालाच्या स्थानिक दुकानांमध्ये माशांसाठीची औषधं उपलब्ध आहेत. “त्यांना बरं करण्यासाठी आम्ही त्यांना वेगळ्या भांड्यात ठेवतो आणि फक्त औषधं देतो. एरवीचं खाणं पूर्ण बंद करावं लागतं.”