“पूर्ण-वेळ शेती करून पुरेसे पैसे कमविणे कसं काय शक्य आहे?” सी. जेयाबल विचारतात. “ती माणसं पाहिलीत का?” तामिळनाडूच्या त्यांच्या भात शेतीत आम्ही चालत असताना, त्यांनी एका वडाच्या झाडाखाली बसलेल्या घोळक्याकडे बोट दाखविले. “त्यांच्यापैकी कोणीही फक्त शेतीवर अवलंबून राहू शकत नाही. एक ट्रॅक्टर चालवतो, दुसरा बांधकाम साहित्य लॉरीने वाहून नेतो, तिसरा कोणीतरी बेकरी चालवतो. आणि मी, इथून २५ किलोमीटरवर, मदुराईतल्या एका हॉटेलात पोहायला शिकवतो.”

मदुराई जिल्ह्याच्या नाडूमुदलाईकुलम गावातले, जेयाबल यांचे शेत अतिशय साधे आहे. वडील चिन्नाथेवर, वय ७५, यांच्याकडून वारसा म्हणून लाभलेली त्यांच्या मालकीची १.५ एकराची शेती आहे. त्याचबरोबर इतर दोन शेतात ते मजुरीही करतात. ते वर्षातून तीनदा भाताचं पीक घेतात – एक असं पीक ज्याची सातत्याने मागणी असते पण कधीकधीच ते फायदा देते. प्रति एकर, रू. २०,००० मध्ये ते नांगरणी करतात पण फायद्याचं म्हणाल तर फार काही हाती लागत नाही. आणि त्यासाठी, जेयाबल आणि त्यांची पत्नी एकत्र रोज १२ तास अविरत कष्ट उचलतात. एवढे तास कष्ट करूनही प्रति एकर, प्रति तास, प्रति व्यक्ती रू. ९.२५ एवढीच मिळकत हाती येते. “माझ्या मुलांना हे काम करावंसं वाटेल?” जेयाबल विचारतात.


02-IMG_2966-AK-Where-Farming-means-Two-Full-Time-Jobs.jpg

एक महिला शेत मजदूर भाताची रोपणी करताना


तामिळनाडूमध्ये शेती करणे आता लोकप्रिय व्यवसाय नाही. २०११ च्या जनगणना रेकॉर्डनुसार, २००१ ते २०११ मध्ये पूर्ण वेळ शेती करणार्यांच्या संख्येत ८.७ लाखाची घट झाली आहे. कर्जामुळे अनेकांनी स्थलांतर केलेले आहे किंवा जमीन गमावलेली आहे. ते सर्व कोठे बरं गेले असतील? त्याचे जनगणना आपल्याला एक उत्तर देते: त्याच दशकात राज्यात शेत मजदूरांमध्ये ९.७ लाखाची वाढ झालेली दिसते.

पण, जेयाबल यांना शेतीची आवड आहे. इथली माती, त्यांचे शेत त्यांना प्रिय आहे. ३६ वर्षे वयाच्या जेयाबल यांना आपल्या गावाचा, तिच्या आजूबाजूच्या ५,००० एकराच्या शेतजमिनीचा फार अभिमान आहे. भातांच्या शेतांमध्ये, बांधांवरून चालताना अलगदपणे पाऊले टाकतानाही, ते खूप जलद चालतात. मी मात्र ओल्या, निसरडया बांधांवरून चालताना जवळ जवळ घसरून पडले. शेतात काम करणार्या महिलांनी ते पाहिले आणि त्या हसल्या. आत्ताशी फक्त सकाळचे ११ च वाजले होते, पण त्या महिला गेल्या सहा तासांपासून घाम गाळत आहेत – पहिले तीन तास घरी आणि उरलेले इथे तण काढण्यासाठी.


03-IMG_2799-AK-Where-Farming-means-Two-Full-Time-Jobs.jpg

जेयाबल भातांच्या शेतांमध्ये बांधांवरून चालताना


एखाद्या तमिळ चित्रपटातील गाण्यात शोभून दिसेल असा रमणीय भूप्रदेश! अवकाळी पडलेल्या डिसेंबरच्या पावसामुळे टेकडया हिरव्यागार आणि पाण्याची तळीही भरलीत. एखाद्या झाडाला पांढरी फुले यावीत त्याप्रमाणे बगळे येऊन जमलेत. शेतकरी स्त्रिया सरळ रेषेत राहिल्या आहेत – त्यांचे नाक गुडघ्यापर्यंत जाईल अशा प्रकारे त्या चिखलात घोटयापर्यंत कंबरेत वाकून – लहान हिरवे, कोवळे अंकुर त्या जमिनीत पेरत आहेत. चिखलाच्या त्या रपरपीत त्या सहजपणे आणि तालबद्धतेने पेरणी करत करत पुढे जात आहेत, एकदाही पाठ सरळ करावी म्हणून त्या उभ्या राहिल्या नाहीत.


04-IMG_3023-AK-Where-Farming-means-Two-Full-Time-Jobs.jpg

नाडूमुदलाईकुलमचा सुंदर रमणीय प्रदेश


फक्त घाम गाळणेही पुरेसं नाही. "नवीन जाती वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, थोडा धोका पत्करला पाहिजे. चार वर्षांपूर्वी, मी थोडी जोखीम घेऊन लहान-धान्य असलेला 'अक्षया' भात पेरला. प्रत्येक एकरामागे मी ३५ पोत्यांची कापणी केली, ज्यात प्रत्येक पोतं रू. १,५०० ला विकले गेले. पण," जेयाबल हसून सांगतात, "जशी मी पीक घ्यायला सुरूवात केली, प्रत्येकाने मग तेच पीक घेतले. अर्थातच, दर घसरले." यंदाही भाताला चांगली किंमत मिळेल अशी जेयाबल यांना आशा वाटते. यावर्षीच्या लहरी, प्रचंड पावसामुळे संपूर्ण राज्यात पिकाचे नुकसान झालेले असल्याने, भाताची किंमत वाढली आहे.

जेयाबल यांच्या घरी परतत असताना, ते पाऊस, पाणी, सूर्य, माती, गायी आणि तळ्याबद्दल बोलत होते. त्यांचे अन्न आणि दैव काही घटकांवर अवलंबून आहे. नऊ किलोमीटर अंतरावरील, चेक्कानुरानी शहरातील एका दुकानाद्वारे त्यांची विविध पिके ठरविली जातात, जिथून ते बियाणे आणि खते विकत घेतात. जेव्हा त्यांना पोहण्याच्या तलावावर काम नसतं, तेव्हा त्यांचा दिनक्रम - तण काढणे, सिंचन, फवारणी, चारा - यासारख्या शेतीच्या कामांनी व्यापलेला असतो.

आठवड्यातील सहा दिवस आणि प्रत्येक दिवशी नऊ तास, जेयाबल आधुनिकतेने परिपूर्ण मदुराईच्या हॉटेलमध्ये एका वेगळ्याच विश्वात जगतात. "रोज सकाळी मी शेतावर एक-दोन तास काम करतो. जर माझी हॉटेलमध्ये सकाळची शिफ्ट असेल (सकाळी ८ ते संध्याकाळी ५) तर, मी शेतातून बाइकवरून थेट निघतो. सकाळची न्याहरी करायला कुठे वेळ मिळतो? एकदा तिथे पोहोचल्यावर, जेयाबल कामावरचा पोशाख करून, हॉटेलातील पाहुण्यांना मदत करण्यासाठी, मोहक, भव्य जलतरण तलावाच्या बाजूला उभे राहतात. त्यांनी हॉटेलात काम करता करता शिकलेल्या इंग्रजी भाषेत, ते विदेशी पाहुण्यांना मदुराईबद्दल माहिती देतात. त्यांना हे काम आवडते, आणि महिन्याला मिळणार्या रू. १०,००० मुळे त्यांना मोलाची मदत होते. काही दशकांपूर्वी पोहण्याची अतिशय आवड असलेल्या जेयाबल यांच्यासाठी हे काम खूप प्रिय आहे.


05-IMG_2792 & IMG_20150801_115622(Crop) -AK-Where-Farming-means-Two-Full-Time-Jobs.jpg

जेयाबल त्यांच्या शेतात (डावीकडे) आणि मदुराईच्या हॉटेलमध्ये (उजवीकडे)


मदुराई शहर जलिकट्टू (बैल काबूत आणणे) या खेळासाठी प्रसिद्ध आहे. जेयाबल यात प्रवीण होते. त्यांनी कबड्डी, डिस्कस आणि शॉट पुट यांसारख्या स्पर्धांही जिंकल्या आहेत. त्यांच्या घरी, त्यांच्या पत्नी, पोधुमणींनी टेबलाच्या खणातून जेयाबलांची ढिगभर प्रमाणपत्रे आणून दाखविली. समोरची खोली मोठी आणि आयाताकृती आहे, जी दिवाणखाना आणि स्वयंपाकघर यांच्यात लहान, चुन्याने लीपापोती केलेल्या चिखलाच्या भिंतीने विभागली आहे. पोटमाळ्यावर कपडे, पिशव्या आणि चारा ओळीत आहेत. भिंतींवर २००२ पासूनचे त्यांच्या लग्नाचे फोटो आहेत.


06-IMG_3090-AK-Where-Farming-means-Two-Full-Time-Jobs.jpg

जेयाबल यांनी जिंकलेली सर्व प्रमाणपत्रे


जेयाबल त्यांनी खेळात जिंकलेल्या सर्व बक्षीसांची यादी सांगत आहेत. "सोन्याचं नाणं, कुथुविलाक्कु (पारंपारिक दिवा), टिव्ही, सायकल, अगदी ज्याच्या आधारावर आपण आता आहात ते जातं, हे सर्व मला खेळांमध्ये बक्षीस म्हणून मिळालंय." पण २००३ आणि २००७ मधील पावसाच्या कमतरतेमुळे कठिण काळ आला होता. "अन्न नाही, पैसे नाही. माझ्यावर पत्नी आणि दोन लहान मुलं यांची जबाबदारी. मी हमालाचं काम केलं. नंतर २००८ मध्ये पुन्हा माझ्या कुटुंबाच्या पारंपारिक व्यवसायाकडे वळलो: शेती." त्याच वर्षी, त्यांनी हॉटेलमध्ये काम करणे सुरू केले. जेयाबल आवर्जून सांगतात, दोन्ही कामं, शेती, पोहणे शिकविणे, ह्या पूर्ण वेळच्या नोकर्या आहेत. "फक्त एका कामावर अवलंबून राहून जगणे शक्य नाही."

पुरूष म्हणून, जेयाबल यांना त्यांच्या कष्टाचे रोख पैसे मिळतात. पोधुमणी, जेयाबल यांच्या, ७० वर्षांच्या वृद्ध आई, कन्नामल, यांच्यासह गावातील बहुतेक स्त्रियांना मात्र तेवढेच तास काम करूनही कमी पैसे मिळतात. दिवसभरात त्या अनेक शिफ्ट्समधून काम करतात. सर्वप्रथम, घरी पहाटे ५ वाजता काम सुरू होतं, सकाळी ८ ते दुपारी ३ शेतात. दुपारच्या जेवणानंतर, त्या जनावरांसाठी गवत, जळणासाठी लाकूड गोळा करतात. त्यानंतर, गोठा साफ करणे, गायी-म्हशींचे दूध काढणे आणि शेळ्यांना चरायला पाठविणे ही सर्व कामे करतात. पुन्हा स्वयंपाकाची वेळ होते. "ती नसती," जेयाबल प्रेमाने म्हणतात, "तर मी अशा दोन-दोन नोकर्या करणं अशक्य झालं असतं आणि घर चालवूच शकलो नसतो."


07-IMG_3087-AK-Where-Farming-means-Two-Full-Time-Jobs.jpg

जेयाबल आणि त्यांच्या पत्नी पोधुमणी त्यांच्या घरी


नाडूमुदलाईकुलममध्ये स्त्रियांसाठी काही रोजगाराच्या संधी आहेत. गावातल्या १,५०० रहिवाशांपैकी प्रौढ हे प्रामुख्याने शेतीतच आहेत. पण मुलांचे मन मात्र दुसरीकडे आहे. त्यांना अभ्यास करून नोकरी मिळवायची आहे. पालकांचं कष्टप्रद आयुष्य आणि अपुरे उत्पन्न यांमुळे मुलांना शेतीची नावड आहे. शेतमजदूरांना दिवसाकाठी १०० रू. मिळतात. मनरेगा अंतर्गत (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना) रू. १४० कमविणे शक्य आहे. पण ते काम फार मुश्किलीने हाती लागतं. त्याच्या आगमनाची वेळही चुकीची आहे. "मनरेगा, लागवड आणि कापणीच्या काळात, जेव्हा मजदूर उपलब्ध नसतात, तेव्हा काम देते. आम्हांला चहा आणि मेदूवड्याची न्याहरी देऊन मजूरांना आकर्षित करावं लागतं," जेयाबल कुरकुरत होते.

"कर्जात बुडणं अतिशय सोपं आहे," जेयाबलांच्या दु-चाकीवर गावात फेरफटका मारताना ते सांगत होते. एक कापणीचा हंगाम फसला की झालं गुंतवलेले पैसे बुडाले. भाड्याने घेतलेल्या जमिनीचे पैसे, रोजचे, अनपेक्षित खर्चही आहेतच. "माझ्या वडिलांच्या काळी, लोक खूप मजबूत आणि कुशल होते. ते स्वत:च बांधही घालायचे. पण माझ्या पिढीने ते महत्वाचे ज्ञान गमावले आहे. आता, आम्हांला पाण्याची पातळी नियंत्रित करायला बांध कसा फोडायचा एवढंच माहित आहे. आमची शेतं तयार करायला आम्ही दुसर्यांना पैसे देतो." त्यांच्या मते, येणार्या दशकांमध्ये ही परिस्थिती अजूनच चिघळणार आहे.

"मी माझी १२वी पूर्ण केली नाही; शिक्षण नाही, म्हणून मी शेतकरी झालो. माझ्यासमोर कमी पर्याय होते. पण माझी मुले, हम्सवर्दन, १३ आणि आकाश, ११, त्यांना शिकायचंय आणि ऑफिसमध्ये नोकरी करायचीय. ते मला सांगतात: पप्पा तुम्हांला पैसे पाहिजेत ना, आम्ही मदुराईत काम करू आणि कमवू. त्यांना हे असं आयुष्य नकोय," जेयाबल, नाडूमुदलाईकुलमच्या अनेक एकरांच्या हिरव्या भातखाचरांकडे हात हलवत सांगत होते.

हा लेख "ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविका' या लेखमालेतील असून NFI नॅशनलमीडिया अॅवॉर्ड 2015 अंतर्गत समर्थित आहे.

Aparna Karthikeyan

अपर्णा कार्थिकेयन स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत. ग्रामीण तामिळनाडूतील नष्ट होत चाललेल्या उपजीविकांचे त्या दस्तऐवजीकरण करतात आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडियासाठी स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात.

यांचे इतर लिखाण अपर्णा कार्थिकेयन
Translator : Pallavi Kulkarni

पल्लवी कुलकर्णी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांची अनुवादक आहे.

यांचे इतर लिखाण पल्लवी कुलकर्णी