केवलबाई राठोड, वय ६०. एका हातपंपावर जोर लावून पाणी भरतायत. दर वेळी तो जडच्या जड दांडा दाबताना घशातून आवाज येतोय, हाताच्या शिरा फुगतायत आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिकच गहिऱ्या होतायत. इतका सगळा जोर लावूनही कसंबसं थेंबथेंब पाणी हंड्यात पडतंय. त्यांच्यामागे गावकऱ्यांची रांग लागलीये. पंपाचं पाणी कधी जाईल, सांगता येत नाही.
तासभरात, संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत केवळबाईंचे फक्त दोन हंडे भरून झालेत. त्यांचे पती रामू, वय ६५, पलिकडे एका खडकावर, हवेत नजर लावून बसलेत. “झाला रे,” केवलबाई आवाज देतात, रामू उठून उभे राहतात, पण जागचे हलत नाहीत. त्या एक हंडा उचलून त्यांना नेऊन देतात. ते आपल्या खांद्यावर जपून हंडा ठेवतात, केवलबाई दुसरा हंडा घेतात. रामूचा हात आपल्या खांद्यावर ठेवतात आणि दोघं घराकडे जायला निघतात. “त्यांना दिसत नाही,” माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून केवलबाई सांगतात.







