"आता आम्हाला रोज कमीत कमी २५ घरं, अन् प्रत्येक घरी महिन्यातून चार वेळा जाऊन यावं लागेल, कोरोना व्हायरसचा सर्व्हे करायला," सुनीता राणी सांगतात. "एकीकडे हरियाणातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना त्या गेले १० दिवस अशा फेऱ्या मारतायत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार १४ एप्रिल रोजी १८० हून जास्त नवे रुग्ण आणि २ मृत्यू झाले आहेत.
"लोक या आजाराला घाबरले आहेत. खूप जणांना वाटतंय की तो स्पर्श केल्याने पसरतोय. मीडियावाले सारखं 'सामाजिक अंतर' म्हणत राहतात. कोरोनाव्हायरस काय आहे आणि त्यांनी किती दूर राहायला हवं, हे सांगितल्यावरही त्यांच्याशी नजर कशी मिळवावी हे मला कळत नाही," सुनीता म्हणतात. "१० बाय १० फुटांच्या घरात सात जण एकत्र राहत असतील तर त्यांच्यात कुठून आलंय सामाजिक अंतर?"
३९ वर्षीय सुनीता हरयाणातल्या सोनिपत जिल्ह्यातील नथुपूर गावात आशा म्हणून काम करतात. ग्रामीण भारतातील लोक आणि सार्वजनिक आरोग्यसेवांमधला दुवा असणाऱ्या १० लाख आशांपैकी एक. कोविड-१९ ची साथ आता सार्वजनिक आरोग्य आणि समाज कल्याणाची सर्वात मोठी समस्या झाली असल्याने त्यांच्या रोजच्या व्यस्त दिनचर्येत उलथापालथ झालीये. एरवी त्यांचा संपूर्ण दिवस ६० विविध प्रकारची काम करण्यात जातो, उदा. नवजात बालकांना लसी देणं, गरोदर महिलांची देखभाल करणं, तसंच त्यांना कुटुंब नियोजनाबाबत सल्ला देणं, इत्यादी.
१७ मार्च रोजी हरियाणातील गुरुग्राम येथे कोविड-१९ ची पहिली घटना नोंदवण्यात आली. तोवर सोनिपतमधल्या आशांना त्यांच्या पर्यवेक्षकांकडून या आजाराबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती. चार दिवसांनी सोनिपतमध्ये पहिला रुग्ण सापडला. तरीही गावकऱ्यांसाठी किंवा त्यांना जागरूक करण्यासाठीच्या नव्या सुरक्षा नियमावलीबद्दल पर्यवेक्षकांनी चकारही काढला नाही. २ एप्रिल रोजी सुनीता यांच्यासह सोनिपत येथील १,२७० आशांना सार्स-सीओव्ही-२ या जीवघेण्या विषाणूविरुद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या लढाईत अग्रस्थानी राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं, तोवर देशव्यापी टाळेबंदी जाहीर झाली होती आणि राज्यात कोविड-१९ मुळे पहिला मृत्यू नोंदवण्यात आला होता.
सुनीता यांच्या देखरेखीखाली सुमारे १,००० गावकरी असून त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक घरात कुटुंबातील सर्व सदस्यांचं वय, परदेशातून कोणी आलंय का आणि कोविड-१९ च्या संक्रमणाची जास्त शक्यता असलेल्यांच्या तब्येतीची स्थिती, उदा. कर्करोग, क्षयरोग किंवा हृदयविकाराचे रुग्ण, या घटकांची नोंद घेणं, हे त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांमध्ये समाविष्ट आहे. "मी कोणामध्ये फ्लू किंवा कोरोनाव्हायरसची लक्षणं असतील तर ते तपासून त्यांची नोंद घेते. हे सारं काही कठीण नाही. नोंदी ठेवण्याची मला सवय आहेच, पण परिस्थिती पार बदलून गेली आहे," सुनीता म्हणतात.




