पावसाळा ओसरत आलाय. बडगाव खुर्द गावातल्या स्त्रिया आसपासच्या शेतांमधून आपल्या मातीच्या घराला लिपारा करण्यासाठी ओली माती आणतायत. भिंती मजबूत करण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठीही हे अधून मधून केलं जातं, खास करून सणसमारंभाआधी.

२२ वर्षांच्या लीलावती देवीलाही इतर बायांसोबत माती आणण्यासाठी जायचं होतं. पण तिचा तीन महिन्यांचा तान्हा मुलगा रडत होता आणि झोपीच जात नव्हता. तिचा नवरा २४ वर्षांचा अजय ओराउँ जवळच्याच त्याच्या किराणा दुकानात गेला होता. ती बाळाला कुशीत घेऊन होती आणि थोड्या थोड्या वेळाने त्याच्या कपाळावर तळवा ठेवत होती, ताप पाहिल्यासारखा. “त्याला काही झालं नाहीये, मला तरी तसं वाटतंय,” ती म्हणते.

२०१८ साली लीलावतीच्या मुलीला ताप आला आणि त्यातच ती वारली. “फक्त दोन दिवस ताप आला होता, जास्त पण नव्हता,” लीलावती सांगते. आपली मुलगी कशाने गेली हे याहून जास्त काही त्यांना माहित नाही. दवाखान्याच्या नोंदी नाहीत, औषधं लिहून दिलेल्या चिठ्ठ्या नाहीत, औषधं देखील नाहीत. अजून काही दिवस ताप उतरला नाही तर या दोघांनी तिला त्यांच्या गावाहून ९ किलोमीटरवर असलेल्या कैमूर जिल्ह्यातल्या अधौरा तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जायचं ठरवलं होतं. पण तसं काहीच झालं नाही.

कैमूर अभयारण्याला अगदी लागून असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाराला कुंपणाची भिंत नाही. बडगाव खुर्द आणि शेजारच्याच बडगाव कालनमधले रहिवासी (दोन्ही गावांसाठी हेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे) आवारात येणाऱ्या जंगली जनावरांच्या – अस्वलं, बिबटे आणि नीलगाय – गोष्टी सांगतात. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अगदी आरोग्य कर्मचारी देखील इथे काम करायला त्यामुळे जरा नाखुशच असतात.

“इथे [बडगाव खुर्दमध्ये] उपकेंद्र देखील आहे, पण ती इमारत तशीच पडून आहे. शेरडं आणि इतर प्राण्यांचं घर झालंय ते,” फुलवासी देवी सांगतात. २०१४ पासून त्या आशा म्हणून काम करतायत – त्यांच्याच फूटपट्टीप्रमाणे फार काही यश येत नसलं तरीही.

In 2018, Leelavati Devi and Ajay Oraon's (top row) baby girl developed a fever and passed away before they could take her to the PHC located close to the Kaimur Wildlife Sanctuary. But even this centre is decrepit and its broken-down ambulance has not been used for years (bottom row)
PHOTO • Vishnu Narayan

२०१८ साली, लीलावती देवी आणि अजय ओराउँ (वरच्या रांगेत) यांच्या तान्ह्या मुलीला ताप आला आणि त्यातच ती वारली. कैमूर अभयारण्याला लागून असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याइतकाही वेळ त्यांना मिळाला नाही. अर्थात हे आरोग्य केंद्रही अडगळीतच गेलंय आणि इथली रुग्णवाहिका अनेक वर्षांत वापरली गेली नाहीये (खालच्या रांगेत)

“डॉक्टर अधौरा शहरात राहतात [इथून १५ किलोमीटरवर]. मोबाइल फोन लागत नाहीत, त्यामुळे तातडीची मदत हवी असली तरीही मी कुणाला संपर्क करू शकत नाही,” फुलवासी सांगते. असं असलं तरीही इतक्या वर्षांत तिने किमान ५० बायांना प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा त्याला लागूनच असलेल्या माता बाल रुग्णालयात आणलं असल्याचं ती सांगते. या इमारतीलाही तशीच अवकळा आली आहे आणि इथे महिला डॉक्टरही नाहीत. इथे सगळं काम नर्स किंवा एएनएम आणि पुरुष डॉक्टरच पाहतात. हे दोघंही गावात राहत नाहीत आणि फोन लागत नसल्यामुळे आपात्कालीन परिस्थितीत त्यांना संपर्क करणं अवघड होऊन जातं.

तरीही फुलवासीने काम थांबवलेलं नाही. बडगावच्या ८५ कुटुंबांच्या (लोकसंख्या ५२२) आरोग्याची काळजी ती घेतीये. इथले रहिवासी प्रामुख्याने ओराउँ या आदिवासी समुदायाचे आहेत, फुलवासी स्वतःही. त्यांचं आयुष्य आणि उपजीविका शेती आणि जंगलांभोवतीच गुंफलेल्या आहेत. काही जणांकडे थोडी फार जमीन आहे ज्यात ते मुख्यतः भात काढतात. काही जण रोजंदारीच्या शोधात अधौरा आणि इतर शहरांमध्ये जातात.

“तुम्हाला वाटेल इथे फार थोडे लोक राहतात, पण सरकारची मोफत रुग्णवाहिकेची सेवाही इथे मिळत नाही,” फुलवासी सांगते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात गेली अनेक वर्षं जुनी, मोडकळीला आलेली रुग्णवाहिका तशीच उभी आहे. “आणि लोकांच्या मनात हॉस्पिटलबद्दल, तांबीबद्दल आणि गर्भनिरोधक गोळ्यांबद्दलही गैरसमज आहेत [तांबी कशी आणि कुठे बसवतात आणि गोळ्या घेतल्यामुळे थकवा येतो, गरगरायला होतं]. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळं घरकाम उरकल्यानंतर वर ‘जाणीव-जागृती’ साठी इथे कुणाला वेळ आहे, माता-बाल आरोग्य, पोलिओ, आणि इतरही बरंच काही?”

आरोग्य सेवा घेण्यात येणारे हे अडथळे बडगाव खुर्दमधल्या गरोदर आणि नुकत्याच बाळंत झालेल्या बायांशी बोलताना सातत्याने पुढे येत होते. आम्ही ज्यांच्याशी बोललो त्या सगळ्या बाया घरी बाळंत झाल्या होत्या. आता राष्ट्रीय कुटुंब पाहणी अहवाल (एनएफएचएस-४, २०१५-१६) सांगतो की कैमूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रसूतींपैकी ८०% दवाखान्यात झाल्या आहेत. हा अहवाल असंही दाखवतो की घरी बाळंतपण झालं तरी २४ तासाच्या आत नवजात बाळाला आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे.

बडगाव खुर्दमधली २१ वर्षीय काजल देवी माहेरी प्रसूत झाली आणि आता आपल्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन सासरी परत आलीये. संपूर्ण गरोदरपणात ती एकदाही डॉक्टरकडे गेलेली नाही ना तिची कोणती तपासणी झाली. बाळाचं लसीकरणही अद्याप झालेलं नाही. “मी माझ्या आईच्या घरी होते. मला वाटलं एका घरी परतल्यावर लस द्यावी,” काजल सांगते. आपल्या माहेरी देखील बाळाला लस देता आली असती याबद्दल ती अनभिज्ञ आहे. तिचं माहेर म्हणजे जरासं मोठं १०८ उंबरा आणि ६१९ लोकसंख्येचं बडगाव कालन हे गाव. या गावाची स्वतःची आशा कार्यकर्ती आहे.

'I have heard that children get exchanged in hospitals, especially if it’s a boy, so it’s better to deliver at home', says Kajal Devi
PHOTO • Vishnu Narayan
'I have heard that children get exchanged in hospitals, especially if it’s a boy, so it’s better to deliver at home', says Kajal Devi
PHOTO • Vishnu Narayan

‘मी असं ऐकलंय की हॉस्पिटलमध्ये बाळांची अदलाबदली होते, मुलगा असेल तर जास्तच. म्हणून घरीच बाळंतपण केलेलं बरं,’ काजल देवी म्हणते

डॉक्टरांकडे जायला बाया बिचकतात कारण भीती असते आणि अनेकदा मुलग्याचा हव्यासही त्यासाठी कारणीभूत ठरतो. “मी असं ऐकलंय की हॉस्पिटलमध्ये बाळांची अदलाबदली होते, मुलगा असेल तर जास्तच. म्हणून घरीच बाळंतपण केलेलं बरं,” काजल सांगते. गावातल्या म्हाताऱ्या बायांच्या मदतीने तिने घरीच बाळंतपण केलं त्याचं कारण विचारल्यावर ती सांगते.

बडगाव खुर्दची रहिवासी, २८ वर्षीय सुनीता देवी सांगते की तीदेखील नर्स किंवा डॉक्टरांच्या मदतीशिवाय घरी बाळंत झाली. तिची मुलगी तिच्या कुशीत गाढ झोपलीये. तिच्या चारही गरोदरपणात सुनीता कधीच तपासणीसाठी दवाखान्यात गेलेली नाही.

“दवाखान्यात खूप लोक असतात. मी लोकांच्या समोर बाळंतपण कसं करणार? मला लाज वाटते. आणि त्यात जर मुलगी झाली तर अजूनच वाईट,” सुनीता सांगते. फुलवासीनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये देखील खाजगीपणा जपला जाऊ शकतो यावर काही तिची विश्वास बसत नाही.

“घरी बाळंतपण करणं सगळ्यात चांगलंय – गावातल्या म्हाताऱ्या बाया मदतीला येतात. तसंही चार बाळंतपणं झाल्यावर तुम्हाला फार कुणाची मदत लागत नाही म्हणा,” हसत हसत सुनीता सांगते. “आणि मग ते येऊन इंजेक्शन देतात आणि मग बरं वाटतं.”

इंजेक्शन द्यायला येणाऱ्या माणसाला इथले काही लोक “बिना-डिग्री डॉक्टर” म्हणतात. सात किलोमीटरवरच्या ताला बाजारातून तो येतो. त्याचं काय शिक्षण झालंय, किंवा त्याच्याकडच्या इंजेक्शमध्ये नक्की काय असतं हे कुणालाच नक्की माहित नाहीये.

आपल्या कुशीत निजलेल्या मुलीकडे सुनीता पाहते. आमच्या गप्पांच्या ओघात आपल्याला तिच्या मनातली आणखी एक मुलगी झाल्याची अपराधीपणाची भावना डोकावते, आपल्या मुलींची लग्नं कशी लावून द्यायची याची चिंता जाणवते आणि घरातला एकमेव पुरुष सदस्य असलेल्या आपल्या नवऱ्याला रानात काम करायला मदतीचा हात नाही याची काळजीदेखील.

Top left: 'After four children, you don’t need much assistance', says Sunita Devi. Top right: Seven months pregnant Kiran Devi has not visited the hospital, daunted by the distance and expenses. Bottom row: The village's abandoned sub-centre has become a resting shed for animals
PHOTO • Vishnu Narayan

डावीकडे वरतीः ‘चार लेकरं झाल्यावर तशीही फारशी काही मदत लागत नाही म्हणा,’ सुनीता देवी म्हणते. उजवीकडे वरतीः सात महिन्यांची गरोदर असलेली किरण देवी लांबचं अंतर आणि खर्च यामुळे हॉस्पिटलला गेलीच नाहीये. खालच्या रांगेतः गावाचं निर्मनुष्य उपकेंद्र जनावरांसाठी निवारा बनलंय

बाळंतपणाच्या आधीचे आणि नंतरचे ३-४ आठवडे सोडले तर सुनीता दररोज घरकाम उरकून दुपारी शेतात जात होती. “थोडंफारच काम असतं – पेरणी-बिरणी, फार काही नाही,” ती पुटपुटते.

सुनीताच्या घरापासून काही घरं सोडली की २२ वर्षीय किरण देवीचं घर लागतं. ती सात महिन्याची गरोदर आहे, आणि ही तिची पहिलीच खेप आहे. ती एकदाही दवाखान्यात गेलेली नाही. एक तर लांब अंतर चालत जावं लागेल आणि भाड्याने गाडी केली तर त्याचा खर्च ही दोन महत्त्वाची कारणं. काही महिन्यांपूर्वीच किरणची सासू वारली (२०२० मध्ये). “हुडहुडी भरून आली, आणि इथेच त्या गेल्या. हॉस्पिटलमध्ये आम्ही जाणार तरी कसं?”

बडगाव खुर्द किंवा बडगाव कालन या दोन्ही गावात जर अचानक कुणी आजारी पडलं तर पर्याय फारच मोजके आहेतः प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला कुंपणाची भिंतही नाही, माता व बाल रुग्णालय केंद्र (प्रत्यक्ष हॉस्पिटल कैमूरच्या जिल्हा रुग्णालयात आहे) जिथला एकमेव डॉक्टरही उपलब्ध असेलच असं नाही किंवा मग इथून ४५ किलोमीटरवर असलेलं कैमूर जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या भाबुआमधलं हॉस्पिटल.

अनेकदा, किरणच्या गावातले लोक हे अंतर पायीच कापतात. निश्चित वेळा नसलेल्या काही बस आहेत आणि दळणवळणाच्या नावाखाली काही खाजगी वाहनं. मोबाइल फोनला नेटवर्क सापडेल असं ठिकाण शोधणं आजही मुश्किल आहे. इथल्या लोकांचा कित्येक आठवडे एकमेकांशी कसलाही संपर्क नसतो.

फुलवासी तिच्या नवऱ्याचा फोन घेऊन येते, “चांगलं पण निरुपयोगी खेळणं आहे हे,” ती म्हणते. तिचं काम जरा सुधारावं म्हणून काय करता येईल यावर तिचं हे उत्तर असतं.

डॉक्टर नाही ना नर्स, चांगलं दळणवळण आणि संपर्क- ती म्हणतेः “यामध्ये एक पाऊल जरी पुढे गेलं ना, खूपशा गोष्टी बदलतील.”

शीर्षक चित्र  : लाबोनी जांगी. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे

पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Anubha Bhonsle

मुक्‍त पत्रकार असणार्‍या अनुभा भोसले या २०१५ च्‍या ‘पारी फेलो’ आणि ‘आयसीएफजे नाइट फेलो’ आहेत. अस्‍वस्‍थ करणारा मणिपूरचा इतिहास आणि ‘सशस्‍त्र दल विशेष अधिकार कायद्या(अफ्‍स्‍पा)’चा तिथे झालेला परिणाम या विषयावर त्‍यांनी ‘मदर, व्‍हेअर इज माय कंट्री?’ हे पुस्‍तक लिहिलं आहे.

यांचे इतर लिखाण Anubha Bhonsle
Vishnu Narayan

विष्णु सिंग पटणा स्थित मुक्त पत्रकार आहेत.

यांचे इतर लिखाण Vishnu Narayan
Illustration : Labani Jangi

मूळची पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातली लाबोनी जांगी कोलकात्याच्या सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेसमध्ये बंगाली श्रमिकांचे स्थलांतर या विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. ती स्वयंभू चित्रकार असून तिला प्रवासाची आवड आहे.

यांचे इतर लिखाण Labani Jangi
Series Editor : Sharmila Joshi

शर्मिला जोशी पारीच्या प्रमुख संपादक आहेत, लेखिका आहेत आणि त्या अधून मधून शिक्षिकेची भूमिकाही निभावतात.

यांचे इतर लिखाण शर्मिला जोशी
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे