“या गोळीसोबत कायम गोड काही तरी घ्यायचं, मध, गूळ, काही तरी,” ग्रामीण आरोग्य अधिकारी (आरएचओ) असलेल्या ऊर्मिला डुग्गा सांगतायत. तीन वर्षांची सुहानी तिच्या आजीच्या मांडीत निपचित पडलीये.
या लहानगीला हिवतापावरची कडू गोळी खाऊ घालायचीये. त्यामुळे तिघींचं कौशल्य आणि थोडे लाड कामी येतात. तिघी म्हणजे तिची आजी, सावित्री नायक ही दुसरी ग्रामीण आरोग्य अधिकारी (आरएचओ) आणि मितानिन (आशा) असणारी मनकी कचलन.
या सगळ्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या ३९ वर्षीय ऊर्मिला वरिष्ठ आरएचओ आहेत. एका मोठ्या रजिस्टरमध्ये त्या सगळे तपशील लिहून ठेवतात. समोरच्या आवारात मुलांच्या खेळण्याचे आवाज येतायत. हा तात्पुरता दवाखाना छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्याच्या नौमुंजमेटा गावातल्या अंगणवाडीच्या ओसरीत भरतोय. ओसरीला वरती थोडं छत घातलेलं आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी या अंगणवाडीत ओपीडी म्हणजेच बाह्योपचार दवाखाना भरतो – कच्चीबच्ची अक्षरं शिकत असतात तेव्हाच बाया आणि त्यांची बाळं तपासून घेण्यासाठी दवाखान्याच्या रांगेत उभी असतात. ऊर्मिला आणि त्यांच्या सहकारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येतात, आपलं सामान, वह्या, तपासणीची यंत्रं, लसीकरणाचं साहित्य सगळं काढतात. एक टेबल आणि बाकडं व्हरांड्यात हलवतात आणि रुग्णांना तपासायला सज्ज होतात.
त्या दिवशी सुहानीची जलद निदान तपासणी (rapid diagnostic test (RDT)) करण्यात आली. ऊर्मिला आणि त्यांच्या सहकारी आरएचओ ३५ वर्षीय सावित्री नायक नारायणपूर तालुक्याच्या सहा गावांमध्ये दर वर्षी अशा हिवतापाच्या ४०० तरी तपासण्या करत असतील.
“आमच्यासाठी हिवताप ही सगळ्यात मोठी समस्या आहे,” नारायणपूर जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. आनंद राम गोटा सांगतात. “रक्तपेशी आणि यकृतावर यामुळे परिणाम होतो, रक्तक्षय होतो आणि त्यामुळे शक्ती जाते. त्याचा परिणाम रोजगारावर होतो. मुलं जन्माला येतानाच कमी वजनाची असतात आणि मग हे चक्र असंच सुरू राहतं.”










