रामकृष्ण रेड्डी कृष्णा जिल्ह्याच्या वडलामणु गावात खंडाने घेतलेल्या २.५ एकर जमिनीत मका करतात. आंध्र प्रदेशच्या अगिरीपल्ले मंडलातल्या रेड्डी आणि इतर आठ शेतकऱ्यांनी हैद्राबादच्या आयएमएल सीड्स प्रा. लि. या कंपनीला बियाणं विकण्यासाठी म्हणून एकूण ३० एकरांवर मक्याची लागवड केलीये. “आम्ही सप्टेंबर २०१६ मध्ये लागवड केली आणि मार्च २०१७ मध्ये [सुमारे ८० टन] बियाणं विकलं. आता वर्ष होत आलं तरी कंपनीने आमचे नऊ जणांचे मिळून १० लाख रुपये अजूनही आम्हाला दिलेले नाहीत,” ४५ वर्षीय रामकृष्ण सांगतात.
हा धंदा असा आहे, कंपनी दर वर्षी सप्टेंबरच्या सुमारास शेतकऱ्यांना संकरित बियाणं देते. बियाणं करणारे शेतकरी त्याची लागवड करतात आणि त्यातून किती तरी पटीत तयार झालेलं बी पुढच्या वर्षी मार्चच्या सुमारास कंपनीला विकतात. मग कंपनी हे बियाणं मक्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विकते आणि मोठा नफा कमवते. बियाणं करणाऱ्या शेतकऱ्यांना कंपनीकडून काही मोबदला हा खतं, कीटकनाशकं आणि अगदी कर्जाच्या रुपातही दिला जातो, व्याज वर्षाला २४ ते ३६ टक्के. शेतकऱ्याला शेवटी जी काही रक्कम मिळते त्यातून कर्ज – मुद्दल आणि व्याज – कापून घेतलं जातं.
कंपनीने मार्चच्या अखेरपर्यंत पैसे देणं अपेक्षित असतं, मात्र पैसा बहुतेक वेळा २-३ महिने उशीराच येतो. २०१७ मध्ये मात्र आयएमएल सीड्सने शेतकऱ्यांना पैसेच दिले नाहीत. थकलेली रक्कम, त्यात गेल्या काही वर्षांपासून लागवडीचा खर्च आणि भाव याचा मेळ बसत नाहीये त्यामुळे मक्याचं बियाणं करणारे अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाले आहेत आणि काहींना तर शेती सोडून द्यायला लागली आहे.
पिल्ली श्रीनिवास, वय ४०, वडलामणु गावातले, १५ वर्षांपासून मक्याचं बियाणं करणारे एक शेतकरी. ते सांगतात, “माझ्यावर [खाजगी सावकारांचं ]एकूण १५ लाखांचं कर्ज आहे. माझी स्वतःची फारशी जमीन नाही त्यामुळे मी वर्षाला खंडाचे १५,००० रुपये देतो.”





