वारली लोक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलेसाठी - भौमितिक आकृत्या वापरून काढलेल्या चित्रांसाठी - ओळखले जात असले तरी उत्तर मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या (संजय गांधी पार्क) त्यांच्या लाकूड, विटा आणि अॅसबेसटॉसनं बांधलेल्या साध्या घरात, या कलेचा मागमूसही नाही.
“इथे फक्त एकच वारली कलाकार राहतो,” आशा कावळे सांगतात. त्या रावळपाडाच्या रहिवाशी आहेत. “बाकी आम्ही सगळे पोटापाण्याचं बघतो.” ४३ वर्षांच्या आशा किंवा त्यांचे दोन धाकटे भाऊ यांपैकी कोणालाही चित्र कसं काढतात, हे शिकवण्यात आलेलं नाही. “ते इतकं महत्त्वाचं असेल असं कधी वाटलं नाही,” त्या म्हणतात.
ही कला ठाऊक असलेला एकमेव कलाकार, २५ वर्षांचा दिनेश बरप, जो आपल्या कुटुंबासोबत संजय गांधी पार्क येथील नवा पाडा येथे राहतो, तो पण हे मान्य करतो: “वारली लोकांनाच त्यांची कला पसंत नाही.” चित्र कसं काढायचं हे दिनेश आपल्या आजीकडून शिकला. बालवाडीत काम करणाऱ्या त्याच्या आईने, शामू यांनीसुद्धा आपल्या आईकडून धडे घेतले. पण तो म्हणतो, “आमच्याकडे पैसा नसल्यानं ती या कामाला वेळ देऊ शकली नाही.”
शिवाय, आशा सांगतात त्याप्रमाणे बराच काळ संजय गांधी पार्क येथे राहणारे वारली “[पुनर्वसनाच्या] भीतीखाली राहत आहेत. ते आम्हाला येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला कधीपण बाहेर हाकलून लावू. मग आम्ही काय करणार? आम्हाला अनोळखी जागेत नव्यानं घर बांधावं लागेल,” तरीसुद्धा आशा यांचं कुटुंब “या जागी सात पिढ्यांपासून” राहत आहे. “राग येतो तो याचा”, त्या म्हणतात, “की त्यांनी आमची जमीन हिसकून तिच्यावर आम्हालाच छोटी-मोठी कामं दिलीत, आमच्यावर काय उपकार करतायत काय?”










