सूर्य मावळतीला गेला होता. झपाट्याने अंधार वाढत होता. डोक्यावर सरपण आणि हातात भांडी, विटा, तांदूळ, सुके मासे आणि मसाले घेऊन, हजारो आदिवासी - आयोजकांच्या मते ५०,००० - मोर्चा घेऊन ईशान्य मुंबईतील मुलुंड येथील जुन्या जकात नाक्याकडे चालत होते. ओस पडलेल्या या जागी आंदोलकांनी तळ ठोकला होता.
"आम्ही इथे ठिय्या मांडून बसू. आम्हाला हव्या त्या सगळ्या वस्तू आम्ही सोबत घेऊनच आलोय. चुलीसाठी सरपण, अन्न शिजवायला भांडी, तांदूळ - सगळं आणलंय," आपल्या डोक्यावर असलेली सरपणाची मोळी नीट करत मनूबाई गवारी म्हणाल्या. "आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून हलत नाय." वारली जमातीच्या मनूबाई, ६०, भिवंडी तालुक्यातील दिघशी गावात राहतात; त्या आपल्या गावातील इतर ७०-८० लोकांसोबत मोर्चासाठी इथे आल्या आहेत.
गुरुवार, ३० ऑक्टोबर, रोजी सकाळी ११ वाजेपासून वारली, कातकरी, महादेव कोळी, म. ठाकूर आणि इतर आदिवासींचे लोंढे नाशिक, पालघर, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांतून ठाणे शहरात शिरायला लागले. भाड्याच्या टेम्पोतून, बस आणि रेल्वेतून ते इथे पोचले होते. दुपारपर्यंत बाया आणि माणसांचा लोंढा साकेत नाक्याहून दोन किमी दूर ठाणे शहरातील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला जाऊन धडकला. त्यात शेतमजूर, हमाल, सफाई कर्मचारी आणि बांधकाम मजुरांचाही समावेश होता.








