"या [एका मोठ्या ब्रॅंडने विक्रीला काढलेल्या] कुडतीवर असलेला बिल्ला बघा. 'तोडा पुखुर' म्हणे. कापडावर छपाई केलीये नुसती! आणि यांना आपली माहितीदेखील तपासून घ्यावीशी वाटली नाही; आमच्या कामाला 'पुखुर' अन् काय काय म्हणतायत.. असले शब्द तर आमच्या बोलीतच नाहीत," वासमल्ली के. म्हणतात.
तोडा बोलीत या जमातीच्या भरतकामाला पोहोर म्हणतात. त्यांच्या साठीत असलेल्या वासमल्ली एक अनुभवी कारागीर आहेत. त्या तमिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुंदा तालुक्यात कारीकडमुंड नावाच्या वस्तीत राहतात. इथून १६ किमी दूर, ऊटी (उदगमंडलम्) येथे शीला पॉवेल तोडा भरतकामाची विक्री करणारं दुकान चालवतात. एका नावाजलेल्या विक्रेत्याने फक्त २,५०० रुपयांना 'तोडा' साडी ऑनलाईन विकायला ठेवली होती. हे पाहून त्यांना देखील विश्वास बसेना. त्यांनी लगेच ती साडी मागवली. "जाहिरातीत लिहिलं होतं 'तोडा भरतकामाची साडी, तमिळनाडूतील महिलांनी आपल्या हातांनी विणलेली'. ते एवढ्या कमी पैशात ही साडी कशी विकू शकतात आणि ती बनवली कुठे आहे, हे मला जाणून घ्यावंसं वाटलं."
साडी काही दिवसांत घरपोच मिळाली. "मशीनने भरतकाम केलेलं होतं. आणि खराब धागे लपवण्यासाठी उलट्या बाजूवर एक कापडाची पट्टी लावली होती," शीला म्हणतात. "तसं भरतकाम काळ्या आणि लाल रंगातच केलं होतं, एवढंच काय ते साम्य."
पारंपरिक पद्धतीत तोडा जमातीच्या महिला ब्लीच न केलेल्या पांढऱ्या सुती कापडावर विशिष्ट लाल आणि काळ्या (आणि कधी कधी निळ्या) रंगांच्या धाग्याचं भरतकाम करतात. तोडा जमातीचा पारंपरिक पोशाख म्हणजे पुटुकुली, एक विशेष तऱ्हेची शाल. हा पोशाख केवळ खास प्रसंगीच परिधान केला जातो – जसं की मंदिरात दर्शनाला जाणं, सणवार आणि अखेर प्रेतवस्त्र म्हणून. १९४० दरम्यान तोडा जमातीच्या महिलांनी इंग्रज ग्राहकांसाठी मागाल-तसे-मिळेल या तत्त्वावर टेबलक्लॉथ, पिशव्या आणि इतर वस्तू बनवायला सुरुवात केली. पुढे बरीच दशकं ही विक्री जो मागणी करेल त्याच्यापुरतीच मर्यादित होती. पूर्वी फक्त सुती धागा वापरला जायचा, पण आता बहुतांश महिला लोकरी धागा वापरतात, कारण, त्या म्हणतात, तो स्वस्त आणि वापरायला सोपा आहे.










