आधी वडील आणि नंतर दुसऱ्या दिवशी आई. या वर्षीच्या [२०२१] मे महिन्यात दोघांनाही एका पाठोपाठ ताप आला आणि पुरुषोत्तम मिसाळ एकदम हबकून गेले. “गावातल्या बऱ्याच जणांना आधीच करोना झाला होता,” पुरुषोत्तम यांच्या पत्नी विजयमाला सांगतात. “तेव्हा इतकी भीती वाटायली होती.”
बीडमध्ये हॉस्पिटल रुग्णांनी खचाखच भरली आहेत हे पुरुषोत्तम यांच्या कानावर आलं होतं. “त्यांना कल्पना होती की आई-वडील दोघांना खाजगी दवाखान्यात भरती करावं लागणार आणि तिथे सगळ्यालाच भरपूर खर्च येतो,” विजयमाला म्हणतात. “नुसता एक आठवडा तर माणूस भरती झाला तरी लाखात बिल येतं.” पुरुषोत्तम यांची एक अख्ख्या वर्षाची कमाई पण तितकी भरत नाही.
गरिबी असली तरी या कुटुंबाने आतापर्यंत कशासाठी कर्ज काढलं नव्हतं. दवाखान्याच्या खर्चासाठी कर्ज काढायच्या विचाराने ४० वर्षीय पुरुषोत्तम फारच अस्वस्थ झाले. परळी तालुक्यातल्या आपल्या हिवरा गोवर्धन या गावापासून १० किलोमीटरवरच्या सिरसाळा गावी ते चहाची टपरी चालवायचे. मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा उद्रेक झाला तेव्हापासून ती बंद असल्यातच जमा होती.
आईला ताप आला त्या रात्री पुरुषोत्तम यांचा काही डोळ्याला डोळा लागत नव्हता. ते या कुशीवरून त्या कुशीवर करत होते. पहाटे चार वाजता ते त्यांच्या पत्नीला म्हणाले, “कोविड असला तर?” पुरुषोत्तम चक्क जागे होते, नजर आढ्याला लागली होती, असं ३७ वर्षीय विजयमाला सांगतात. 'चिंता करू नका' असं त्यांना सांगितल्यावर, “तेच म्हणाले, ‘असू दे, काळजी करू नको,’ आणि मला झोपी जा असं म्हणाले.”











