“मी माझ्या नातवंडांसाठी आलीये इथे,” सुमारे साठीच्या गंगूताई चंदर वरघडे सांगतात. “कोणास ठावं, मी आज चालले तर त्यांची आयुष्यं सुधरतील.”
गंगूताई महादेव कोळी या अनुसूचित जमातीच्या आहेत. त्या पालघर या आदिवासी बहुल किनारी जिल्ह्यातल्या मंजूशी मेट गावच्या आहेत.
नाशिकच्या मुंबई नाक्यापाशी असलेल्या बसस्टॅँडबाहेर त्या आणि त्यांच्या काही मैत्रिणी झाडाखाली बसलेल्या होत्या. त्यांचे हाल कसे वाढलेत आणि सरकारकडे त्यावर कोणताही उपाय नाही असंच त्या सगळ्यांचं म्हणणं होतं.
“आमच्या जमिनी आम्हाला नावावर करून हव्या आहेत,” गंगूबाई म्हणतात. दशकानुदशकं त्या आणि त्यांच्यासारखे इतर असंख्य लोक कसत असणाऱ्या जमिनी वन खात्याच्या ‘मालकी’च्या आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिमेकडच्या किनारी भागातल्या ठाणे, पालघर, नाशिक आणि शेजारच्या जिल्ह्यातल्या हजारो कुटुंबांनी २००६ च्या वन हक्क कायद्याअंतर्गत अशा जमिनीचे पट्टे त्यांना मिळावेत अशी मागणी लावून धरली आहे. असं झाल्यास त्यांना सरकारी योजना आणि बँकांमधून कर्जही मिळू शकेल. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षीच्या मैलाचा दगड ठरलेल्या लाँग मार्चनंतर वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं, जे त्यांनी बिलकुल पाळलेलं नाही.
“आम्हाला चांगल्या भविष्य हवंय,” ताई बेंदर म्हणते. पालघर जिल्ह्यातली तरूण शेतकरी आणि कार्यकर्ती असणारी ताई तिला आणि तिच्या गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची यादीच वाचते. “आमचं पाणी मुंबई आणि इतर शहरांसाठी वळवण्यात येतंय, आम्ही त्या विरोधातही लढा देतोय.”







