बी. किस्ता यांची फार काळापासून फळबागेत नशीब आजमावून पाहण्याची इच्छा होती. "शेतात राबून मिळणाऱ्या मजुरीत माझं कर्जच फिटेना," ते म्हणतात. मागील वर्षी त्यांनी अखेर यात उडी घेतली – आणि चार एकर जमीन भाड्याने घेतली. "चार एकर जमीन कसायला मी [वर्षाला] एकरी रू. २०,००० भाडं भरलं," किस्ता म्हणतात, जे बोडीगनिदोड्डी गावी राहतात. "मी शेती करायला लागलो, आशा होती, माझ्या मुलाच्या अन् मुलीच्या लग्नासाठी गेल्या तीन वर्षांत घेतलेली कर्जं फेडता येतील."
पण मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम् मंडलातल्या त्यांच्या गावात आणि इतर गावांमध्ये वादळी वाऱ्यासह हवामान बिघडलं. आणि त्यांच्या शेतातल्या ५० टन केळींपैकी निम्मी केळी (आणि कलिंगड) वाया गेली. उरलेलं फळ विकून त्यांना जेमतेम रू. १ लाख मिळाले – पण त्यांना तब्बल ४ लाखांचा तोटा झाला. पूर्वीची कर्जं फेडणं राहिलं दूर, सावकाराकडची त्यांची उधारी रु. ३.५ लाखांहून रू. ७.५ लाखांवर गेली.
अनंतपूरमधील शेतकऱ्यांना २०१९ चा पावसाळा फायद्याचा ठरला होता. किस्तांप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही रब्बी हंगामात जोमदार पीक आल्याने चांगली कमाई होण्याची आशा होती. केळीच्या शेतकऱ्यांना रू. ८,००० प्रति टन एवढा भाव अपेक्षित होता.
पण २५ मार्च रोजी, रब्बी हंगाम संपता संपता लॉकडाऊन जाहीर झाला. बाजारात अनिश्चितता असल्यामुळे व्यापारी माल विकत घ्यायला कचरू लागले. याचा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम झालाय – रब्बी हंगामात एप्रिलपर्यंत साधारण दर दोन आठवड्यांनी केळी काढल्या जातात, यावेळी त्यांना दर काढणीला फटका बसला.
जी. सुब्रह्मण्यम् हे बुक्करायसमुद्रम् गावातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी एक. त्यांनी ३.५ एकर जमिनीवर अंदाजे रू. ३.५ लाख खर्च करून केळीचा बाग लावला. एप्रिलमध्ये त्यांच्या ७० टनांपैकी पुष्कळसा माल त्यांनी गावात आलेल्या व्यापाऱ्यांना फक्त रू. १,५०० प्रति टन या भावाने विकला. त्या महिन्यात ८-९ टन केळी भरलेले ट्रक केवळ रू. ५,००० ला विकत घेण्यात येत होते – शेतकऱ्यांना एका टनासाठी अपेक्षित असलेल्या भावापेक्षा रू. ३,००० कमी.






