“हा पत्रा फार उपयोगी आहे. आजही आमचा पाडा अंधारात आहे. आणि म्हणूनच मी आज या मोर्चात सामील झाले आहे. कमीत कमी आम्हांला वीज तर द्या आता,” मंगल घाडगे, वय ४७, स्वतःच्या डोक्यावर सौर उर्जेचा छोटा पत्रा सांभाळत बोलत होत्या. त्या नाशिकमध्ये २०-२१ फेब्रुवारीला निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्च्यामध्ये सामील झाल्या होत्या. “सूर्यप्रकाश या पत्र्यावर पडतो आणि उर्जा गोळा होते. आम्ही तिचा उपयोग संध्याकाळी आमचा मोबाईल फोन किंवा आमची विजेरी चार्ज करण्यासाठी करतो. त्यामुळे आमची जरा तरी सोय होते.”
मंगलप्रमाणे (शीर्षक छायाचित्र) त्यांचे अनेक शेजारी हा सौर पत्रा वापरतात. नाशिक जिल्हयातील दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावापासून जवळजवळ अर्धा किलोमीटर दूर, अशी ही ४० घरांची वस्ती आहे. इथले सर्व रहिवासी महादेव कोळी या अनुसूचित जमातीतील आहेत. त्यांच्यातील अनेक जण वनजमिनीवर भात, नागली, आणि तुरीची शेती करतात. २०१८ मध्ये अतिशय कमी पाउस झाल्याने त्यांचं पीक एकतर जळून गेलं किंवा उतारा खूप कमी पडला.
मंगलताईंनी ही सौर उर्जेची प्लेट एक वर्षापूर्वी घेतली. “माझ्या पाड्यावरील कोणीतरी हा पत्रा विकत घेतला, तेव्हा त्याला मी माझ्यासाठी पण एक आणायला सांगितला. मग अनेकांनी हा खरेदी करायला सुरुवात केली. याची किंमत २५० रु.आहे, म्हणजे आमच्या सारख्यांचा एका दिवसाचा रोज,” त्या म्हणाल्या.




