जीवनभाई बारिया यांना गेल्या चार वर्षांत दोनदा हृदयविकाराचे झटके येऊन गेले. पहिला झटका २०१८ मध्ये आला. तेव्हा ते घरीच होते. त्यांच्या पत्नी गाभीबेन त्यांना दवाखान्यात घेऊन गेल्या. एप्रिल, २०२२ मध्ये अरबी समुद्रात आपली ट्रॉलर चालवत असताना त्यांना छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांच्या एका साथीदाराने ट्रॉलर सांभाळली आणि दुसऱ्याने भीत-भीत त्यांना आडवं झोपवलं. ते किनाऱ्यापासून साधारण पाच तासाच्या अंतरावर होते. दोन दिवस जीवनाशी झुंज देत जीवनभाई अखेर मरण पावले.
गाभीबेन यांची भीती खरी ठरली.
पहिल्या धक्क्यानंतर जीवनभाई यांनी एका वर्षाने काम पुन्हा सुरू करायचं ठरवलं तेव्हा गाभीबेन फार उत्सुक नव्हत्या. त्यांना यातली जोखीम ठाऊक होती. आणि जीवनभाईंनाही. "मी त्यांना म्हटलं की नका जाऊ कामावर.." गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात जाफराबाद या लहानशा शहरात आपल्या झोपडीत मंद प्रकाशात बसलेल्या गाभीबेन सांगतात.
पण शहरातील इतर बहुतांश लोकांप्रमाणे ६० वर्षीय जीवनभाई यांना मासेमारी सोडून इतर कुठलं कामच माहित नव्हतं. या कामातून त्यांना वर्षाला रू. २ लाख कमाई व्हायची. "ते गेली ४० वर्षं या धंद्यात होते," गाभीबेन, वय ५५, सांगतात. "हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते वर्षभर घरीच आराम करत होते. तेव्हा मी काम [इतर कोळ्यांनी आणलेले मासे खारवणे इत्यादी] करून कसंबसं घर चालवलं. त्यांना बरं वाटायला लागल्यावर ते पुन्हा कामावर जाऊ लागले."
जीवनभाई जाफराबादमधील एका मोठ्या मच्छीमाराच्या मालकीच्या ट्रॉलरवर काम करायचे. पावसाळा वगळता वर्षाचे आठ महिने त्यांच्यासारखे मच्छीमार या ट्रॉलर घेऊन १०-१५ दिवस अरबी समुद्रात जातात. दोन आठवडे पुरेल एवढं अन्नपाणी सोबत नेतात.
"अडचणीच्या वेळी काहीच सोय नसताना इतके दिवस एवढ्या लांब समुद्रात जाणं कधीच सुरक्षित नसतं," गाभीबेन म्हणतात. "फक्त मलमपट्टी करण्याचा डबा सोबत असतो. हृदयविकाराच्या रुग्णासाठी तर ते आणखी धोकादायक आहे."














