तर अशा प्रकारे, अनंतपूर रविवार ५ एप्रिल साठी सज्ज होत आहे. रात्री ९ वाजता ९ मिनिटांकरिता मेणबत्त्या, दिवे, मोबाईल टॉर्च लावून 'आपल्याला वेढणाऱ्या अंधःकाराला' नष्ट करण्यासाठी पंतप्रधानांच्या मागणीला ते कसा बरं प्रतिसाद देईल?  सहज पेट घेतील अशा बांबूच्या मोळ्या जवळच पडलेल्या आहेत आणि जवळपास पाच ते सहा कुटुंबांना मिळून एकच बाल्कनी आहे, अशा माझ्या घराशेजारीच असलेल्या संगमेश नगरात हे कसं बरं करायचं.

माझं स्वतःचं कुटुंब १९ मार्च रोजी स्वेच्छेने लॉकडाऊन मध्ये गेलं. त्यामुळे, या शहरातला हा कमी उत्पन्न असलेला, बहुतांशी कामगार वर्ग असणारा भाग या परिस्थतीला कसं तोंड देतोय हे मला जवळून पाहता आलं.

"कोरोना विषाणू चित्तूरपर्यंत पोचलाय, पण अनंतपूरकडे फिरकायचा नाही. इथे इतकी गरमी आहे की, विषाणू जिवंतच राहणार नाही," माझ्या जुन्या शाळेतील स्कूल बसचालक मला १७ मार्च रोजी म्हणाले होते. ती भाबडी टिप्पणी साधारण इथे लोकांना काय वाटतंय त्याचं दर्शन घडवून गेली. या महामारीची भयानकता तोपर्यंत अनंतपूरमधील बऱ्याच जणांना जाणवली नव्हती. तेव्हापर्यंत तर नक्कीच नाही.

आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागातील अनंतपूर जिल्ह्याचं केंद्र असणाऱ्या या शहरातील गल्ली-बोळांमध्ये मुलं ये-जा करतायत. शाळा आणि परीक्षा रद्द झाल्याने त्यांच्या करामतींना उधाण आलंय. रविवार, २९ मार्च पर्यंत लोक भाजी बाजारात गर्दी करून होते. चिकनचा भाव वाढत चालला आहे.

PHOTO • Rahul M.

आमच्या घराच्या बाल्कनीतून संगमेश नगर परिसराचं विहंगम दृश्य दिसून येतं. शहरातील कमी उत्पन्न असलेल्या , बहुतांशी कामगार वर्गाची ही वस्ती. आमच्या शेजारील कुटुंबं लहान घरांमध्ये राहतात आणि अनंतपूरच्या कायमस्वरुपी उन्हाळ्यात एका घरात पंख्याखाली कोंबून राहणं काही सोपी गोष्ट नाहीये

"पोलिस पहारा द्यायला यायच्या अगोदर माझा मोठा मुलगा [ऑटोरिक्षा चालक] आणि माझी सून सकाळी काम करायला बाहेर पडतात. तो तिला ऑटोतून सोडतो, ती एका घरी स्वयंपाक करून देते अन् संध्याकाळी ते दोघं घरी परत येतात," एक म्हातारी सांगते. कामगार वर्गातील बरेच लोक लपून छपून काम करत असले, तरी खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या लोकांना मात्र ही महामारी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील हवीहवीशी सुटी वाटते आहे. "कोरोना विषाणूमुळे सुट्ट्या लागल्यात ना," मी १९ मार्च रोजी सुपर मार्केटच्या बाहेर एक माणूस म्हणत होता ते मी ऐकलं होतं.

आमच्या घराच्या बाल्कनीतून संगमेश नगर परिसराचं विहंगम दृश्य दिसून येतं. शहरातील कमी उत्पन्न असलेल्या, बहुतांशी कामगार वर्गाची ही वस्ती. आमच्या शेजारील कुटुंबं एक किंवा दोन खोल्यांच्या लहान घरांमध्ये राहतात. ते बराचसा वेळ आपल्या घराबाहेर असतात. आम्ही आमच्या काही शेजाऱ्यांना सामाजिक अंतर ठेवण्याचं महत्त्व पटवून सांगितलं, मात्र अनंतपूरच्या कायमस्वरुपी उन्हाळ्यात एका घरात पंख्याखाली कोंबून राहणं काही सोपी गोष्ट नव्हे. आमच्या शेजाऱ्यांमध्ये ऑटोरिक्षा चालक, भाजीवाले, वराहपालक, शिक्षक आणि घरकामगार आहेत. इतर बरेच लोक टोपल्या किंवा सुपं विणतात. या शेवटच्या गटातील लोकांसाठी प्रत्येकच दिवस घरातून काम करण्याचा असतो. त्यामुळे लॉकडाऊन असला तरी त्यांचं काम चालूच आहे.

बहुतेक दिवशी येथील मुलं सकाळी लवकर उठतात आणि त्यांच्या पालकांना पाणी आणू लागतात. अनंतपूरमध्ये हे अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचं संसाधन आहे. ऑटोरिक्षांच्या मदतीने काही स्थानिक कंपन्या 'शुद्ध पिण्याचं पाणी' विकतायत. त्यांपैकी एक कंपनी २०१४ सालच्या एका तेलुगु चित्रपटातील जोशपूर्ण गाण्यातून आपल्या उत्पादनाची जाहिरात करत आहे. ३० मार्च रोजीदेखील ही विक्री सुरु होती आणि काही महिलांनी आपली प्लास्टिकचे हंडे पाण्याने भरून घेतले. इतर ठिकाणचं पाणी 'जिवाणू आणि विषाणूंनी प्रदूषित' असल्याने अशा काळात लोकांनी 'शुद्ध' पाणीच वापरावं असं आवाहन कंपनीच्या रेकॉर्ड केलेल्या जाहिरातीत करण्यात येत होतं.

लॉकडाऊनमुळे दिनक्रम हळूहळू बदलत असले तरी लोकांना शासनाचे आदेश जे शहरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनांवर केंद्रित आहेत ते पाळणं कठीण जात आहे. मुलांचं खेळणं चालूच आहे (लपंडाव, चोर शिपाई, ज्यात कुठलंही खेळणं लागत नाही). या मुलांकरिता लॉकडाऊन म्हणजे जास्तीच्या सुट्ट्याच आहेत. अगदी आता आता फेरीवाले यायचे बंद झालेत. आमच्या गल्लीत मोठ्याने मंत्रोच्चार करत भाजलेले शेंगदाणे विकणारा फेरीवाला २१ मार्च रोजी यायचा थांबला. २८ मार्च पासून आईस्क्रीमवाला दिसला नाही. भाजीवाला अजून तरी दिसतोय.

आमच्या शेजाऱ्यांसाठी, ज्यांची घरं इतकी लहान आहेत की सगळ्यांना दिवसभर एकाच वेळी घरात राहणं शक्यच नाही, आवश्यक वस्तू साठवून ठेवणं किंवा 'सामाजिक अंतर' पाळणं जवळपास अशक्य. वडीलधारी मंडळी आपल्या जमिनीवर चौकटी आखून फासे टाकून त्यांचा आवडता बैठा खेळ, मेका-पुली (वाघ-बकरी) खेळतात.

PHOTO • Rahul M.

१८-१९ मार्च रोजी अनंतपूरच्या अवतीभोवती घेण्यात आलेले फोटो. इथल्या लोकांना खात्री होती की कोविड-१९ अनंतपूरला काही यायचा नाही , पण लवकरच त्यांना या महामारीचा झटका अनुभवावा लागला

शिवाय, राज्यातील राजकीय गोंधळामुळे लोकांपर्यंत या महामारीचं गांभीर्य पोहोचू शकलं नाही. आणि कदाचित त्यामुळे लॉकडाऊनच्या काही आठवडे अगोदर लोकांच्या वागण्यात काहीशी हलगर्जी आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून राज्य शासनाचा निवडणूक आयोगासोबत विवाद सुरु होता. अगोदर निवडणुका २१ मार्च रोजी होणार होत्या, पण निवडणूक आयोगाने कोरोना विषाणू मुळे पुढे ढकलल्या. तेलगू बातमी वाहिन्यांनी हा प्रकार तेलुगु देसम पक्ष आणि वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष यांच्यातील निवडणुकीचं नाट्य म्हणून गाजवला.  वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते उशिरापर्यंत दारोदारी जाऊन प्रचार करत होते. पुष्कळ लोकांसाठी हेच लोक विश्वासू माहितीदार असल्याने तज्ज्ञांच्या मताला महत्त्व उरलं नाही. आणि माध्यमंही त्यांना प्रसिद्धी देत नव्हते.

इथल्या लोकांना खात्री होती की कोविड-१९ अनंतपूरला काही यायचा नाही, पण लवकरच त्यांना या महामारीचा झटका अनुभवावा लागला. १३ मार्च रोजी मला आमच्या घरातील डिश टीव्हीवर काही वाहिन्या चालू करता येत नव्हत्या. कारण, आमचे केबल तांत्रिक तसेच शेतकरी पी. सुब्बैया त्यांच्या गावी (अनंतपूरच्या नरपाला मंडलात) बी. पप्पूरू इथे केळीचं पीक घ्यायला गेले आणि तिथेच अडकून पडले. ग्राहक सहसा उशिरा खरेदी करतात जेणेकरून त्यांना कमी भावात माल मिळू शकेल. "ग्राहक मंडळांनी ह्याही वेळी तसं करून पाहिलं. पण या संकटामुळे आता खरेदी करायलाच कोणी उरलेलं नाहीये," ते म्हणाले. नंतर, अनंतपूरला परतल्यावर सुब्बैया म्हणाले: "मी गावात केळी सोडून आलो, ती आता उन्हात जळून जातील. माझं अंदाजे १५ लाखांचं नुकसान झालंय."

१ एप्रिल रोजी आंध्र प्रदेशात एकाच दिवशी ६७ घटना पुढे आल्याने सगळा मूड बदलत चालला आहे. कोविडच्या गणतीत अगदी खाली असलेलं राज्य एकूण १३२ घटनांसह पाचव्या क्रमांकावर गेलंय. अनंतपूरमध्ये आता २ रुग्ण आढळून आलेत. मात्र, महामारीचं गांभीर्य अजूनही जिल्हा पातळीवर पसरलेलं नाही. स्थानिक अनंत चॅनेलवर विविध मंडलांमध्ये दानशूर व्यक्तींद्वारे अन्न, तांदूळ, भाज्या आणि मास्क वाटपाच्या बातम्या चालू होत्या. दुर्दैवाने, ह्या अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या काही माणसांनी स्वतःच मास्क आणि ग्लोव्ह घालणे यासारखी खबरदारी घेतलेली नाही.

तर, आता प्रतीक्षा ५ एप्रिल, रात्री ९:०० वाजेपर्यंत

अनुवाद: कौशल काळू

Rahul M.

राहुल एम आंध्र प्रदेशच्या अनंतपूरचे स्वतंत्र पत्रकार आहेत आणि २०१७ चे पारी फेलो आहेत.

यांचे इतर लिखाण Rahul M.
Translator : Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.

यांचे इतर लिखाण कौशल काळू