हे वृत्तांकन पार्थ एम. एन. यांच्या पुलित्झर सेंटरच्या पाठिंबा असलेल्या मालिकेचा भाग आहे.
५३ वर्षीय देऊराव नागरे यांनी पावसाळ्यापूर्वी दिलेलं एक वचन आता त्यांच्या चिंतेचं कारण बनलंय.
अख्खा सप्टेंबर महिना त्यांची परीक्षा पाहणारा ठरला. मुसळधार पावसानं शेतात पाणी पाणी झालं, गुडघाभर पाणी साचलेल्या शेतात त्यांनी पीक वाचवायचा आटापिटा केला. चकलांबा गावातली त्यांची ८ एकर शेती डोंगराच्या उतारावर आहे, जिथं पूराची जास्त भीती असते.
“पावसाचं पाणी थेट माझ्या शेतातून वहातं,” ते सांगतात. “मी रोज पाणी वाहून जावं म्हणून ओहोळ तयार करतो.”
त्यांनी एवढी जीवतोड मेहनत केली खरी पण अस्मानी संकटावर ते काही मात करू शकले नाही. कपाशी, तूर अन् उसाची नासाडी झाली. ३ लाखांचं उत्पन्न देणारं पीक वाया गेलं. डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या जोरामुळे त्यांच्या शेतजमिनीतली काही मातीही वाहून गेली अन् अजून एका समस्येची भर पडली.
आता हे नुकसान भरून काढावं लागणार पण त्याहीपेक्षा जास्त सतावणारा विचार म्हणजे, महाराष्ट्रातल्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या मंदिरासाठी त्यांनी दिलेलं १.७ लाख रुपये देणगीचं वचन. जे आता पूर्ण होईल की नाही याची शंका वाटतेय.















