भारताच्या गावपाड्यात असंख्य लोक अपंगत्व सोसत, भिन्न क्षमतांसह जगतायत. अपंगत्व जन्मजात असू शकतं पण अनेकदा ते समाजाच्या शासनाच्या निष्क्रीयतेमुळे निर्माण होऊ शकतं. झारखंडमधल्या युरेनियमच्या खाणींजवळची गावं असोत किंवा सततच्या दुष्काळामुळे फ्लूरॉइडचं प्रमाण जास्त असलेलं पाणी प्यावं लागणारी मराठवाड्यातली गावं. कुष्ठरोगामुळे लखनौमधल्या कचरा वेचणाऱ्या पार्वती देवींची बोटं झडली तर मिझोरामच्या देबोहाला चकमांची दृष्टी कांजिण्यांमध्ये गेली. पालघरच्या प्रतिभा हिलिम यांचे तर दोन्ही हात आणि दोन्ही पाय गँगरीनमुळे कापून टाकावे लागले. श्रीनगरचा मोहसीन सेरेब्रल पॉल्सीने तर महाराष्ट्रातला प्रतीक डाउन्स सिन्ड्रोममुळे मानसिकदृष्ट्या अपंग आहे. शरीर-मनाच्या अशा स्थितीशी मुकाबला करत असतानाच गरिबी, विषमता, आरोग्य यंत्रणांचा अभाव आणि भेदभावाचाही सामना या सगळ्यांना करावा लागतो. अपंगत्व सोसत आणि स्वीकारत आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या या कहाण्या पारी तुमच्यासाठी घेऊन येत आहे