रुखाबाई पाडवी बोलत असतात आणि बोलता बोलता त्यांना त्या कापडावरून आपला हात फिरवल्यावाचून राहावत नाही. बोलण्याच्या ओघात आपल्याला जाणवतं की असा हात फिरवता फिरवता त्या मनाने अलगद दुसऱ्या कुठल्या तरी काळात आणि आयुष्यात जाऊन पोहोचतात.

“ही माझी लग्नाची साडी!’’ अक्राणी तालुक्यातल्या डोंगराळ आणि आदिवासी भागात बोलल्या जाणाऱ्या भिल्ल या आदिवासी भाषेत त्या बोलू लागतात. खाटेवर बसलेल्या ९० वर्षांच्या वृद्ध रुखाबाई आपल्या मांडीवरच्या त्या सोनेरी काठाच्या गुलबट सुती साडीवरून हळुवार हात फिरवतात.

“ही साडी माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या कष्टाच्या कमाईतल्या बचतीतून विकत घेतली होती. त्यांची आठवण आहे ही!’’ अगदी एखाद्या लहानग्या मुलासारखं निरागस हसत त्या सांगतात.

रुखाबाईंचा जन्म नंदुरबार जिल्ह्यामधल्या अक्राणी तालुक्यातल्या मोजारा या गावचा!

माझ्या लग्नासाठी आई-वडिलांनी ६०० रुपये खर्च केले. त्या काळात ते खूप होते. त्यांनी या लग्नासाठी म्हणून कपडे घेतले ते पाच रुपयांचे! ही साडीसुद्धा त्यातच होती,’’ त्या सांगतात. दागिने मात्र त्यांच्यासाठी त्यांच्या लाडक्या आईने घरच्या घरीच बनवले होते.

“ना कुणी सोनार होता ना कारागीर! चांदीच्या नाण्यांचा एक कंठहार माझ्या आईने स्वत: बनवला. अगदी खरेखुरे पैसे. चांदीच्या नाण्यांना तिने भोकं पाडली आणि ती नाणी गोधडीच्या जाड धाग्यात ओवली,’’ आईच्या त्या जिवापाड मेहनतीची आठवण काढत रुखाबाई सांगतात, “चांदीची नाणी बरं... आजच्यासारखे कागदी पैसे नाही!’’

Left and right: Rukhabai with her wedding saree
PHOTO • Jyoti
Left and right: Rukhabai with her wedding saree
PHOTO • Jyoti

रुखाबाई आणि त्यांची लग्नातली साडी

त्या सांगतात की त्यांचं लग्न एकदम धुमधडाक्यात झालं आणि लगेचच ही तरुण वधू मोजारापासून चार किलोमीटर अंतरावरच्या सुरवानी या आपल्या सासरी रवाना झाली. इथून पुढे मग आयुष्याला वेगळं वळण लागत गेलं. साधेसोपे आनंदी दिवस मागे पडत गेले.

“ते घर माझ्यासाठी परकं होतं पण आता आयुष्यभर आपल्याला इथंच राहायचंय हे मी स्वत:ला समजावलं होतं,’’ नव्वदी पार केलेल्या रुखाबाई सांगतात, “मला मासिक पाळी येत होती, त्यामुळे इतरांच्या नजरेत मी ‘मोठी’ होते.’’

“पण लग्न म्हणजे काय, नवरा म्हणजे काय... मला काहीच ठाऊक नव्हतं.’’

त्या तेव्हा खरोखरंच लहान होत्या; मित्रमैत्रिणींसोबत खेळण्याइतपत लहान! बालवयात झालेल्या लग्नामुळे त्यांना वयाला न साजेसे कष्ट उपसत लवकर मोठं व्हावं लागलं.

“रात्रभर मी मका आणि बाजरी दळायचे. माझे सासू-सासरे, नणंद, नवरा आणि मी. पाच लोकांसाठी दळण दळावं लागायचं.’’

या कामापायी त्या पार थकून जायच्या, पाठही सतत दुखायची. “मिक्सर आणि गिरणीमुळे आता गोष्टी खूप सोप्या झाल्यात.’’

आपल्या मनातली ही घुसमट बोलून कुणापाशी दाखवणार? तसं जवळ कुणीच नव्हतं. ऐकून घेणारं कुणीच नाही अशी गत. आपलं सहानुभूतीने ऐकायला कुणी नाही अशा परिस्थितीत रुखाबाईंना एका निर्जीव वस्तूत एक अनोखा जोडीदार सापडला.

जुन्या ट्रंकेत ठेवलेली मातीची भांडी बाहेर काढता काढता त्या म्हणतात, “बराचसा वेळ मी यांच्यासोबत घालवलाय... चुलीवर... बऱ्या - वाईट गोष्टींचा विचार करत! माझे संयमी श्रोते म्हणजे ही भांडी.’’

Left: Old terracotta utensils Rukhabai used for cooking.
PHOTO • Jyoti
Right: Rukhabai sitting on the threshold of her house
PHOTO • Jyoti

डावीकडे : रुखाबाई स्वयंपाकासाठी वापरत असलेली जुनी मातीची भांडी. उजवीकडे : घराच्या उंबऱ्यावर बसलेल्या रुखाबाई

तसं हे काही फार वेगळं नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्त्रियांना स्वयंपाकाशी निगडीत आणखी एका साध्या गोष्टीत विश्वासाचा आधार गवसत आलाय; ते म्हणजे जातं. स्वयंपाकघरातल्या जात्यावर दळता दळता या बायका त्यांचा आनंद, दु:ख, सल, वेदना गाण्यातून व्यक्त करायच्या. आणि अर्थातच ही गाणी त्यांचा नवरा, मुलगा, भाऊ यांच्या कानावर कधीच जायची नाहीत. जात्यावरच्या ओव्यांबद्दल अधिक वाचा.

ट्रंकेतल्या वस्तूंमध्ये घुटमळत असताना जणू रुखाबाईंच्या उत्साहाला उधाण येतं. “ही डावी (वाळलेल्या दुधीभोपळ्यातून  कोरलेली पळी)! पूर्वी आम्ही असंच पाणी प्यायचो,’’ कसं हे दाखवत त्या सांगतात. रुखाबाईंच्या चेहऱ्यावर हसू आणायचं तर ही इतकी साधीशी गोष्टही पुरेशी ठरते.

लग्नानंतर वर्षभरातच रुखाबाई आई झाल्या. घर आणि शेतीची कामं कशी सांभाळायची हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं.

बाळाचा जन्म झाला आणि घरावर अक्षरक्ष: निराशेचं सावटच पसरलं. “घरातल्या प्रत्येकाला मुलगा हवा होता, पण मुलगी जन्माला आली होती. मला याचा काहीच त्रास झाला नाही, कारण बाळाची काळजी घ्यायची होती ती मला एकटीलाच!’’ त्या सांगतात.

Rukhabai demonstrates how to drink water with a dawi (left) which she has stored safely (right) in her trunk
PHOTO • Jyoti
Rukhabai demonstrates how to drink water with a dawi (left) which she has stored safely (right) in her trunk
PHOTO • Jyoti

आपल्या ट्रंकेत (उजवीकडे) अगदी निगुतीने जपून ठेवलेल्या डावीतून (पळीतून) पाणी कसं प्यायचं (डावीकडे) ते रुखाबाई दाखवतात

मग पुढे रुखाबाईंना पाच मुली झाल्या. “मुलगा हवाच यासाठी इतका आग्रह होता की बस्स! शेवटी मी त्यांना दोन मुलगे दिले आणि मोकळी झाले,’’ आठवताना त्यांना अश्रू आवरत नाहीत.

आठ लेकरांना जन्म दिल्यानंतर रुखाबाई खूपच अशक्त झाल्या. “आमचं कुटुंब वाढलं; पण आमच्या दोन गुंठ्यांवरचं (साधारण २ हजार चौरस फुटांपेक्षा जरा जास्त) उत्पादन नाही वाढलं. खायला पुरेसं नसायचं आणि त्यातही अगदी कमी वाटा मिळायचा बायका आणि मुलींना. पाठीदुखीने माझी पाठ काही सोडली नाही, तरी काही फरक पडला नाही.’’ जगायचं तर जास्त कमावणं भाग होतं. “खूप दुखायचं, पण वेदना होत असूनही मी माझ्या नवऱ्यासोबत - मोत्या पाडवी - रस्ते बांधायच्या कामावर जायचे. दिवसभराच्या कामाचे ५० पैसे मिळायचे.’’

आज रुखाबाईंच्या डोळ्यांसमोर त्यांच्या कुटुंबातली तिसरी पिढी वाढतेय. “हे नवीन जग आहे,’’ त्या म्हणतात आणि बदलामुळे काही चांगल्या गोष्टी घडल्यात असंही नमूद करतात.

जसं बोलणं शेवटाकडे येतं तसं रुखाबाई आजच्या जमान्यातली एक विचित्र गोष्ट नोंदवतात: “पूर्वी मासिक पाळीच्या दिवसात आम्ही सगळीकडे जायचो. आता त्या दिवसात बायकांना स्वयंपाकघरात प्रवेश दिला जात नाही,’’ त्या वैतागून म्हणतात, “देवाचे फोटो घरात आले, पण बायका त्यातून बाहेर पडल्या.’’

ಜ್ಯೋತಿ ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಹಿರಿಯ ವರದಿಗಾರರು; ಅವರು ಈ ಹಿಂದೆ ‘ಮಿ ಮರಾಠಿ’ ಮತ್ತು ‘ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ1’ನಂತಹ ಸುದ್ದಿ ವಾಹಿನಿಗಳೊಂದಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.

Other stories by Jyoti
Editor : Vishaka George

ವಿಶಾಖಾ ಜಾರ್ಜ್ ಪರಿಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯ ಸಂಪಾದಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಜೀವನೋಪಾಯ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ವರದಿ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ವಿಶಾಖಾ ಪರಿಯ ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮ ಕಾರ್ಯಗಳ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಪರಿಯ ಕಥೆಗಳನ್ನು ತರಗತಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಲು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ಸುತ್ತಲಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ದಾಖಲಿಸಲು ಸಹಾಯ ಮಾಡಲು ಎಜುಕೇಷನ್ ತಂಡದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ.

Other stories by Vishaka George
Translator : Amruta Walimbe

Amruta Walimbe is an independent journalist and editor with a long experience of working with many NGOs and media houses in Maharashtra. She is also a trained psychologist.

Other stories by Amruta Walimbe